पेण (राजेश प्रधान) : मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासना विरोधात पेण तालुक्यातील शेकडो आदिवासी 13 जानेवारीला पंचायत समितीवर धडकणार आहेत.
पेण शहरापासून हकेच्या अंतरावर उंबरमाळ, तांबडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, खऊसावाडी या ५ आदिवासी वाड्या आहेत. या पाचही आदिवासी वाड्यांमध्ये सुमारे 3500 आदिवासी बांधवांची लोकवस्ती आहे. यापैकी सुमारे 1200 आदिवासी बांधव मतदानास पात्र आहेत. या पाच आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी आजपर्यंत एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या आदिवासी वाड्यांपासून जवळच असलेल्या बोरगाव ग्रामपंचायत व मळेघर ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतींनी या पाचही आदिवासी वाडी आपल्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आदिवासी बांधवांना मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. कोणत्याही ग्रामपंचायतींना या आदिवासी वाड्यांकरीता विकास योजना राबविता येत नाहीत. त्यामुळे हे आदिवासी बांधव रस्ता, वीज व पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
या बाबत तांबडी ठाकूरवाडी येथे नुकताच पाचही वाड्यांची बैठक पार पडली. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष एडवोकेट सिद्धार्थ इंगळे, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्राध्यापक आर. बी. पाटील सचिन गावंड, शैलेश कोंडस्कर, राजेश रसाळ यांच्यासह पाचही वाड्यांतील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात येईल तर ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ह्या संघटनाही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
——————————–
भारतात राहत असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ज्या आदिवासींना 75 वर्ष मतदानाचा हक्क बजावता आला नाही अशांना एकतर निर्वासित भारतीय म्हणून रेफ्युजी शेल्टरमध्ये ठेवावे नाहीतर त्यांना किमान स्वतंत्र ग्रामपंचायत देवून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसोबत जोडून घ्यावे.
—संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते ग्राम संवर्धन सामाजिक संस्था