महाड(रवि शिंदे ) : महाड शहरातील अल कासिम ही धोकादायक इमारत आज रिकामी करण्यात आली. इमारती मधील रहिवाशांनी सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे कारवाई दरम्यान निर्माण होणारी कटूता आणि कायद्याचा वापर टळला.
सुमारे २२ वर्षापुर्वी बांधण्यात आलेली अल कासिम ही इमारत धोकादायक असल्याच्या तक्रारी इमारतीमधील रहिवाशांनी महाड नगर पालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्यात आले. इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रहिवाशांना इमारत सोडण्याच्या सूचना महाड नगरपालिकेने दिल्या. मात्र काही रहिवासी याच इमारतीमध्ये राहात होते. त्यामुळे आज कायदेशीर संरक्षण घेत महाड नगरपालिकेने या रहिवाशांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी या इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा तोडण्यात आला.
सकाळच्या सत्रात पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली. दुपारी हा बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर मुख्याधिकारी जीवन पाटील आणि नगर अभियंता आपल्या पथकासह पोलीस बंदोबस्तात या इमारतीजवळ पोहोचले. २९ फ्लॅट असलेल्या या इमारतीमध्ये केवळ ३ कुटुंब राहात होती. नगर पालिकेचे पथक पोहोचण्यापूर्वीच या कुटुंबांनी आपले सामान हलविण्यास प्रारंभ केला होता.
इमारत रिकामी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने इमारतीला सील ठोकले आहे. इमारत मालकाला ही इमारत पाडून टाकण्यासंदर्भात नोटीस देण्यात येणार आहे. जर मालकाने ही इमारत पाडली नाही तर नगर पालिका ही इमारत पाडण्याची कारवाई करेल अशी माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.