श्रीकांतच्या फोटोजचा अल्बम बघताना जान्हवीला श्रीकांतच्या लहानपणीचे फोटो दिसले.. काही फ्रॉक घातलेले, काही पंजाबी ड्रेस वरचे.. अगदी मुलगी दिसत होता श्रीकांत..!
जान्हवीला आपल्या नवऱ्याचे हे गोंडस रूप फार आवडले.. श्रीकांतला ते फोटो दाखवले, तेव्हा तो हसला.. म्हणाला “आईला मुलगी हवी होती.. आणि झालो मी!! म्हणून तिची हौस ती अशी पूर्ण करून घ्यायची..! माझ्या दोन्ही मोठ्या भावांना सुद्धा बहिण हवी होती.. आत्ताही ते मला चिडवतात.. तू बहिण असतास तर जास्त लाड केले असते..!”
जान्हवीला अचानक एक कल्पना सूचली.. श्रीकांतच्या आईचा वाढदिवस जवळच होता.. त्या निमित्ताने घरात सगळे एकत्र असतील.. जर श्रीकांत मुलीच्या वेशात आई समोर गेला.. तर तिला खुप आनंद होईल…
ही कल्पना तिने श्रीकांतला बोलून दाखवली..
“छे! वेडी-बीडी आहेस का!!!”
श्रीकांतने स्पष्ट नकार दिला..!
“पण प्रॉब्लेम काय आहे???”
जान्हवीने तिचा हेका कायम ठेवला..
“अगं, माझं एक स्टेटस आहे.. बँकेत नोकरीला आहे मी.. थोडी फार इज्जत आहे मला चार चौघांत.. आणि तसंही, मी काही आता लहान राहिलो नाही..!”
श्रीकांतने त्याचा प्रॉब्लेम सांगितला…
“अरे, पण घरातलीच माणसे असणार आहेत.. ज्यांच्या समोर तू लहनाचा मोठा झालास!”
हो – नाही करता करता श्रीकांत तयार झाला..! त्याच्या आईचा वाढदिवस जोरात साजरा झाला.. आणि रात्री सगळे पाहुणे निघुन गेल्यावर.. श्रीकांत मुलीच्या वेशात आई समोर आला.. आणि म्हणाला…
“आई, तुला मुलगी झाली असती, तर अशी दिसली असती..!”
“हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट आहे..!”
हे म्हणताना आई तिचे आनंदाश्रु लपवू शकली नाही… भावांनीही त्याला प्रेमाने उचलून खांद्यावर बसवलं.. !
आईचा आनंद पाहुन श्रीकांतला खुप समाधान वाटलं.. त्याच्या मनात आलं… “आपण उगाच घाबरत होतो.. आपली इमेज जपण्याच्या नादात आपण हा आंनद कधीच मिळवू शकलो नसतो..!”
आपल्या बाबतीतही अनेकदा असंच होतं…
आपण आपल्या माणसांसाठी काही करायला, आपल्या मनाची एखादी गोष्ट करायला घाबरतो..
आपल्या इमेजचा विचार करतो..
चार लोक आपल्याला ओळखतात.. आपल्या बद्दल एखादी वेगळी गोष्ट समजली तर ते ओळख दाखवणे टाळतील.. आपण समाजात एकटे पडू, ही भीती आपल्याला जास्त वाटते…
आणि ह्या सगळ्या विचारांत अनेकदा आपण आपल्या जवळच्या माणसांचा विचार करत नाही.. त्यामुळे कदाचित आपण एखाद्या चांगल्या संधीला, किंवा आनंदाला मूकतो..!
म्हणून अशा वेळी जेव्हा आपल्याला एखादी चांगली गोष्ट करावीशी वाटते.. पण करायची हिंमत होत नाही.. तेव्हा आपणच स्वतः ला विचारायला हवं.. की ते करायला आपल्याला नेमकं काय थांबवतंय..! जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा दोन्ही बाजूंनी विचार करावा.. जर ती गोष्ट केली तर चांगलं काय घडेल.. आणि वाईट काय घडेल..! जेव्हा सगळी उत्तरे आपल्या समोर असतील.. तेव्हा आपण ठरवू शकतो.. की ती गोष्ट करायची की नाही..!
पण कधीही स्वतः ला प्रश्न नक्की विचारायचा.. की नक्की थांबवतंय काय?
– के. एस. अनु