माणगांव (रविंद्र कुवेसकर) : माणगांवमध्ये अनेक दिवसांनी पुन्हा एकदा प्लास्टिक मुक्त माणगांवसाठी नगरपंचायती कडून कारवाई सुरु झाली आहे. यात काही व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशवीचा अवैध वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. आता या स्वच्छता मोहिमेत नगरपंचायत कडून कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असून काही नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करून कचरा करण्याच्या प्रवृत्तींवर आता सीसीटीव्ही कॅमेराद्वारे थेट नजर ठेवणार आहोत. अशी माहीती स्वच्छता-आरोग्य-क्रिडा सभापती अजित तार्लेकर यांनी दिली आहे.
स्वच्छ व सुंदर माणगांवसाठी स्वच्छता ही केवळ नगरपालिका व नगरसेवकांचेच फक्त कर्तव्य नसून, ती आपलीही जबाबदारी आहे. माणगांव मध्ये आपले घर, आपले दुकान, आपल्या उद्योग व्यवसाय च्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण स्वतः स्वच्छता राखतो, त्याचप्रमाणे आपले शहर कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी आपला स्वतःचा देखिल सहभाग, सहकार्य आवश्यक आहे.
त्यामुळेच “स्वच्छता ज्याच्या घरी तेथे आरोग्य आणि लक्ष्मी वास करी!” असं म्हटलं जातं यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्याला कोणीही न सांगता “मी अस्वच्छता करणार नाही व इतर कोणालाही ती करू देणार नाही!” अशा प्रकारे माणगांव शहरवासी म्हणून आपले कर्तव्य पार पाडल्यास, शहर स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. ही गोष्ट खरंतर सगळ्यांना कळते पण आचरणातून ती वळत नाही हे दुर्दैवी आहे.
माणगांव नगरपंचायतीने अनेक वेळेस प्लास्टिकमुक्ती साठी मोहीमा राबविल्या परंतु प्रत्येक वेळी काही दिवसांच्या दिखाव्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या ! या उक्तीप्रमाणे शहरातील अनेक भागातील नागरिक गुपचुपपणे किंवा रात्रीच्या वेळेस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घाण कुडा, कचरा, उरलेसुरले अन्न बेदरकारपणे नवनवीन ठिकाणी निर्माण केलेले ढीग रस्त्यालगत, आडोशाला, कोपऱ्याला फेकून देण्याची प्रवृत्ती आजही माणगांव मध्ये दिसून येत आहे. यात भर काहीजण दिवसाढवळ्या नजरेसमोर कालव्यात कचरा भिरकावतानाचे चित्र आपण सगळेच पाहतो. कालव्याचे चक्क गटारं झाल्याचे बोलतो, पण कोणीही कुणाला यापासुन रोखत नाही.
यामुळेच नुकतेच सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत अस्वच्छता करताना अनेक सुशिक्षित घरातील लोक विशेषता यामध्ये परप्रांतीयांसह काही स्थानिक महिला देखील हे गैरकृत्य करताना प्रत्यक्ष आढळल्या आहेत. हे काम करताना त्यांच्या मनाला जराही खंत वाटत नाही. या स्वच्छता मोहिमेत दंडात्मक कारवाईकडे पाहून काही नागरिक आता बोलतात, कामानिमित्त आम्हाला बाहेर जावे लागते म्हणून घंटागाडीच्या वेळेत आम्हाला त्या गाडीत कचरा टाकता येत नाही. हे जरी सत्य असले तरी असं बोलणाऱ्या नागरिकांनी योग्य खबरदारी घेत काही वेगळी उपाय योजना करून हा कचरा योग्यरितीने संकलित होईल याची काळजी घेतली पाहिजे, ती आपलीच जबाबदारी आहे. यामुळेच शहर स्वच्छतेसाठी आपला सहभाग सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारणे सांगुन, कचरा उघड्यावर टाकून आपण दुसऱ्यांनाही या घाणेरड्या सवयी लावण्यास कारणीभूत ठरतो. या गोष्टीचे सर्वच माणगांवकरांनी भान राखले पाहिजे.
आपल्या शहरात आपलेच पाहुणे, नातेवाईक मित्रमंडळी, पर्यटक येत असतात. तसेच आपलीच लहान मुले, शालेय विद्यार्थी शहरातील मोकळ्या परिसरात खेळतात, फिरतात. जर शहर अस्वच्छ असेल तर सार्वजनिक आरोग्यास धोका म्हणजे आपल्यालाही तो सहन करावा लागणारच. तसेच अस्वच्छ शहर म्हणुन सर्वत्र आपलीच बदनामी करण्यास आपणच कारणीभूत ठरतो. यासाठी शहराची स्वच्छता ही आपली नैतिक जबाबदारी आहे. एखादा लोकप्रतिनीधी मोठा अधिकारी आपल्या शहर भेटीसाठी अथवा शासकिय कार्यालयात येणार असे समजताच, त्या त्या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी, लगेचच आपला परिसर आपली स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी मोठी धावपळ करतात ! हे चित्र आज समाजात आपण नेहमी पाहतो. खरंतर हाच दिखाऊपणा नाटक आपल्या शहर स्वच्छतेच्या दैनंदिन अस्वच्छतेस कारणीभूत ठरत आहे. हे कुणाच्याही लक्षात का येत नाही? सार्वजनिक ठिकाणची दैनंदिन स्वच्छता याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.
मोठ मोठे सुशिक्षीत अधिकारी आणि त्यांच्या शासकिय निवास स्थानांत धुळ कचरा जाऊ नये म्हणुन विशेष काळजी घेतात, हिरवी जाळीची कापड बंगल्या सभोवताली लावुन कचरा मुक्त होतात. समाजात फिरताना मात्र त्यांना परिसरातील कचऱ्याचे नवनिर्मीत डंपिंग दिसत नाहीत. याच ठिकाणाहुन स्वतःच्या मुला-बाळांसह फिरताना आपल्या आरोग्याला ते घातक आहे. हे त्यांनाही वेगळे सांगणे न लागो. हे केवळ एक उदाहरण झाले अशीच प्रवृत्ती सर्रास इतर मोठ्या लोकांचीही आहे. जो पर्यंत स्वच्छता ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आपण मानत नाही, आपण कचरा करणार नाही व इतरांनाही तो करु देणार नाही तसेच वेळीच या प्रवृत्तींना रोखुन परावृत्त करत नाही तो पर्यंत शहर स्वच्छतेला मोठा अडसर येतच राहिल हे निश्चित आहे.
प्लास्टिकचा वापर हा अलिकडे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या बेसुमार प्लास्टिकची योग्य हाताळनी व नियोजीत संकलन आपण करत नाही किंवा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मीतीवर मुळावरच बंधन आणत नाही, तो पर्यंत ही दंडात्मक कारवाई करुनही पुन्हा पुन्हा त्याच प्लास्टीक पिशव्यांचा चुकीचा वापर लोक करत राहणार. यासाठी सर्वांनी छोटे-मोठे व्यापारी दुकानदार, हाॅटेल व्यावसायिक, भाजीपाला, मांस-मच्छी विक्रेते व प्रत्येक घरातील व्यक्तींनी सहकार्य केले तरच शहर स्वच्छ होऊन लौकीकपात्र होईल. व इतर शहरांना ते एक आदर्श उदाहरण ठरेल. यासाठीच “करुया सारे आपण..आपुलकीने संकल्प स्वच्छतेसाठी..आपल्या स्वतःच्या शहरासाठी!” फक्त आपलेपणाच्या भावनेतुनच हे शक्य आहे.