माथेरान (मुकुंद रांजाणे) : रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच नाताळ सणानिमित्त पर्यटकांनी गर्दी केली आहे दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर पहिल्यांदाच पर्यटकांनी माथेरान कडे आगेकूच केलेली आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळचे पर्यटनस्थळ असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल धारकांनी आपल्या हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केलेली दिसत असून सर्वच हॉटेल धारक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. नाताळ आणि ३१ डिसेंबर या दिवसात हॉटेल त्याचप्रमाणे लोजिंग मध्ये सुध्दा ऐनवेळी खोल्या उपलब्ध होत नसतात त्यासाठी बहुतेक पर्यटकांनी आरक्षण केलेले आहे.
हौशी पर्यटक घोड्यावर रपेट मारत असून नव्याने इथे ई रिक्षाचे आगमन झाल्यामुळे आबालवृद्ध, जेष्ठ नागरिक, पर्यटकांना या ई रिक्षाच्या वाहतुकीचा सुखद अनुभव मिळत आहे.
मिनिट्रेनची शटल सेवा अमन लॉज रेल्वे स्टेशन ते माथेरान दरम्यान सुरू असून नेरळ ते माथेरान दरम्यान सुध्दा या मिनिट्रेनच्या दोन फेऱ्या होत आहेत. त्यामुळे पर्यटक मिनिट्रेनचा आनंद आपल्या बालगोपालांसह घेत आहेत. एकंदरीत या आठ दिवसात सर्वाना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.