नवी मुंबई (प्रदीप पाटील) : गणेशोत्सव २२ तारखेला प्रारंभ होत असून यावर्षीच्या कोव्हीड – १९ च्या पार्श्वभूमीवर साज-या होणा-या गणेशोत्सवाकरिता ११ जुलैला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने निर्गमित केल्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तसेच महापालिका विभागीय स्तरावर श्रीगणेशोत्सव मंडळांची पोलीस व वाहतुक पोलीस विभागासह बैठकही घेण्यात आलेली आहे.
याविषयी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनीही ६ ऑगस्ट रोजी विशेष बैठकीचे आयोजन करून श्रीगणेशोत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा व कोव्हीड १९ विषयक सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता मार्गदर्शक निर्देश दिले होते. त्यास अनुसरून विभागीय स्तरावर श्रीगणेशोत्सव आयोजनाविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण २३ पारंपारिक विसर्जनस्थळे बेलापूर ५, नेरूळ २, वाशी २, तुर्भे ३, कोपरखैरणे ३, घणसोली ४, ऐरोली ३, दिघा १असून याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार आहेत.
‘तलाव व्हिजन’ अंतर्गत मुख्य १४ तलावांमध्ये श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गॅबियन वॉलची रचना करण्यात आलेली असून भाविकांनी व श्रीगणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याच ठिकाणी श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन आहे.
प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था तसेच प्रथमोपचार कक्ष असणार आहे. विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून सुविधा मंचही उभारण्यात येत आहे
दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात येत असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात येत आहे. हे प्रसाद साहित्य व फळे ही गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहेत.