नागोठणे (महेंद्र माने) : रा. स्व. संघ जनकल्याण समिती या सेवाभावी संघटनेच्या वतीने समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त महाराष्ट्रात विवीध उपक्रमातील जन संपर्क सप्ताह या उपक्रमातील सेवा रथयात्रेचे मंगळवार 20 डिसेंबर रोजी नागोठणे नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवसेना शाखेत झालेल्या स्नेहसभेत मी देव,देश व धर्मासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सभेचे अध्यक्ष किशोर जैन यांनी केले.
यावेळी सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, ह.भ.प. दळवी गुरुजी,योगेश ठाकुर, सोपान जांबेकर,आनंद लाड,कीर्तीकुमार कळस,सुरेश जैन,श्रेया कुंटे,धनंजय जगताप,समितीचे कोकण प्रांत अविनाश धाट,रायगड कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे,मंदार परांजपे यांच्यासह विभागातील नागरिक व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात किशोर जैन यांनी मी विश्व हिंदू परीषद,रा.स्व.संघ व बजरंग दलातून घडलो असून मला कारसेवेचे तसेच रथ यात्रेचे कार्य करण्याची संधि मिळाल्याने मी भाग्यवान आहे. मी जरी राजकरण करीत असलो तरी माझ्यावर हिंदुत्वाची पकड असल्याने त्या पासून मी कधीच दूर जाऊ शकत नसून मी देव,देश व धर्मासाठी सदैव कटिबद्ध आहे. प्रत्येकाच्या राजकारणात वेगळेपणा असला तरीही हिंदुत्व एकच असून आज राजकारणात हिंदुत्व कुणाचे? यामध्ये चढा ओढ होत असल्याने हिंदुत्वाचा वाढत असलेला प्रभाव प्रकर्षाने दिसून येत आहे.
हिंदुत्वासाठी माझ्याकडे येणार्याला मी पूर्ण सहकार्य व गरजेनुसार आर्थिक मदतही करीत असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. अविनाश धाट यांनी जनकल्याण समितीच्या कार्याची माहिती देताना अतिवृष्टीच्या वेळी केलेली मदत,भूकंपात अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीगृह व शाळा काढणे,कोरोंना काळात रेशन,अन्नसत्र व रुग्णासेवा पुरविणे,पनवेल येथील पटवर्धन रुग्णालयात रुग्णांना कमी दरात होत असलेली विविध उपचार सेवा,ठाणे येथील रक्तपेठीतून गरजूंना होत असलेला मोफत रक्त पुरवठा, दुर्गम भागात आरोग्य सेवक योजना राबवून तेथेच प्रथोमोपचार करणे याची सविस्तर माहिती सांगून या सेवेसाठी रोहा तालुक्यात दहा ठिकाणी केंद्र चालू असल्याचे शेवटी धाट यांनी सांगितले.
आपल्या मनोगतात मंदार परांजपे यांनी समितीच्या वतीने नागोठणे शहरात किशोरी संवाद,कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून रुग्णसेवा साहित्य केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत अमरजा लिमये व श्र्वेता परांजपे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजन उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.