नागोठणे : नागोठणे विभाग नाभिक तरुण संघाच्या वतीने सोमवार दि. 02 जानेवारी रोजी पहाटे 5.30 वा. रा.जि. नाभिक समाज संघाचे विश्वस्त भाईसाहेब टके व विभागीय अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठणे शहरातुन मशाल मिरवणूक काढून अमर रहे अमर रहे वीर भाई कोतवाल-हिराजी पाटील अमर रहे, वंदे मातरम, भारतमाता की जय अशा घोषणा देत ग्राम दैवत जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात दिपस्तंभावर दिप प्रज्वलित करून भारतीय स्वातंत्र लढ्यात इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणार्या भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या सिद्धगड येथे 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे 6.10 वाजता झालेल्या बलिदान वेळेत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव महेंद्र माने, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र टके,शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर,उदंड रावकर, दिगंबर खराडे, महेंद्र पवार, राजेंद्र माने, मनोज गायकवाड,मिलिंद गुजर, जगदीश दिवेकर, दिपक पवार, महेंद्र जाधव, अभिषेक गुजर यांच्यासह विभागातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
नाभिक समाजात जन्मलेल्या भाई कोतवालांनी आपल्या गरीबीवर मात करीत एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. व ब्रिटिश सरकारमध्ये काही काळ नोकरी पत्करली. परंतु देश स्वातंत्र व्हावे, म्हणून नोकरी सोडून ‘जगेन तर स्वराज्यासाठी नाहीतर स्वर्गात’ अशी गर्जना करून महात्मा गांधींच्या करेंगे या मरेंगेच्या लढ्यात स्वता:ला झोकून दिले व आपला क्रांतिवीर गट स्थापन केला.
या चळवळीत भाई हिराजी पाटील यांच्यासह भूमिगत होऊन आगरी व कातकरी समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन ब्रिटीशांविरुद्ध लढू लागले. त्यांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून त्यांची झोप उडवून ब्रिटीशांना वेडावून सोडले. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटीशांनी भाईंना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. या काळात भाई आपल्या साथीदारांसह सिद्धगडच्या जंगलात वास्तवी करीत असत. परंतु त्याची कुणकुण नव्हती तरीही फितुरी झाली व भाई लपून बसलेल्या सिद्धगडला 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे ब्रिटीशांचा वेढा देवून ब्रिटीशांनी अंदाधुंदी गोळीबार केला. त्यात आपल्या साथीदारांसह हिराजी पाटील व भाईंच्या शरीराची चाळण झाली. भाई व हिराजी पाटील धारातीर्थ पडले. दर वर्षी 2 जानेवारी रोजी सिद्धगड येथे भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदान ठिकाळी पहाटे 6.10 वाजता महाराष्ट्र सरकारच्या प्रतींनिधीच्या उपस्थितीत हजारों देश प्रेमींच्या साक्षीने मानवंदना देवून आदरांजली वाहण्यात येत असते.