नागोठणे (महेश पवार) : रोहा तालुक्यात १५ जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नागोठणे विभागातील पळस,कोंडगाव,वरवठणे व ऐनघर या चार ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये नागोठणे विभागात कोणत्याही एका पक्षाचे प्राबल्य न येता संमिश्र निकाल लागला होता. यामध्ये ऐनघरमध्ये शिवसेना-भाजपा युतीने, पळसला राष्ट्रवादी आघाडीने व कोंड्गावमध्ये शेकापने एकहाती सत्ता मिळविली आहे. तर वरवठणेत स्थानिक पातळीवर झालेल्या ग्रामविकास आघाडीने सत्तेच्या चाव्या हस्तगत केल्या आहेत.
दरम्यान निवडणूक निकालानंतर बुधवार दि.१० रोजी नागोठणे विभागातील पळस,कोंडगाव,वरवठणे व ऐनघर या चार ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी नागोठणे जवळील पळस ग्रामपंचायतींमध्ये गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचे विभागीय नेते शिवराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या पळस ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने येथील निवड बिनविरोध झाली. पळसच्या सरपंच पदी राष्ट्रवादी आघाडीच्या परिक्षा विक्रांत घासे-चंदने तर उपसरपंच पदी चंद्रकांत भालेकर यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच कोंडगाव ग्रामपंचायतीत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीने नऊ च्या नऊ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. या ठिकाणी सरपंच पदी कमळ अरविंद बुरुमकर तर उपसरपंच पदी अनंत वाघ यांची निवड करण्यात आली. याचबरोबर गेली अनेक वर्षे शेकापची निर्विवाद सत्ता असलेल्या वरवठणे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीने सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत. या ठिकाणी ग्रामविकास आघाडीच्या ऋतुजा गणपत म्हात्रे या सरपंच पदी विराजमान झाल्या असून विजय अशोक पाटील यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे.