नागोठणे (महेंद्र माने) : सतत होणारे धर्मांतरण व लव जिहाद मार्फत हिंदू महिलांची हत्या तसेच मुरुड येथील गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ बुधवार 28 डिसेंबर रोजी नागोठणे विभाग सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने नागोठणे शहर बंदच्या हाकेला अत्यावश्यक सेवा वगळता 100 % प्रतिसाद मिळाला आहे. संघटन मे शक्ती है असे विभागात बोलले जात असून नागोठणे वासीयांच्या एक जुटीचे विभागासह जिल्हयातून कौतुक होत आहे.
पोलिस अधीक्षक, अलिबाग यांना शहर बंद बाबत दिलेल्या हिंदू समाज बांधवांच्या सह्याचे निवेदनात लव जिहाद मार्फत हिंदू महिलांची होणारी हत्या तसेच नुकतीच मुरुडच्या चंदन जैन यांची लव जिहादच्या माध्यमातून हत्या झाली असून त्यातील नागोठणे येथील आरोपी हा मोकाट फिरत आहे. या हत्ये संदर्भात दोन आरोपींमध्ये झालेला संवाद याची सर्व माहिती व पुरावे चंदन जैन यांची बहीण पुष्पा गांधी यांनी तक्रारीत देऊनही त्याच्यावर लावण्यात आलेले 304 व 34 हे कलम सौम्य असून त्याच्यावर मनुष्यवधाचा 302 व 328 हे कलम लाऊन त्याला तात्काळ अटक करावी. व कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी ही मुख्य मागणी करीत जर आरोपी मोकाट सुटला तर आपले गुन्हे लपविण्यासाठी तो इतरांना धोका पोहचविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात म्हटले असून याच्या निषेधार्थ आम्ही स्वयंस्फूर्तीने आमची दुकाने बंद ठेवत असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार बुधवार 28 डिसेंबर रोजी नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ, खुमाचा नाका, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस.टी.स्थानक, राष्ट्रीय महामार्ग परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यापार्यांनी 100 % बंद ठेवली होती. बंदमध्ये सहभागी होऊन नागोठणे वासीयांनी दाखविलेल्या एकजुटीचे विभागासह जिल्हयातून कौतुक होत आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.