
नागोठणे (महेश पवार) : नागोठणे शुद्ध पाणी पुरवठा योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मला या योजनेचे उद्घाटन करायचे असल्याने काही ठिकाणी शिल्लक असलेले वितरण व्यवस्थेचे काम तसेच जल शुद्धीकरण केंद्रातील यांत्रिक दुरुस्त्यांसह या जलशुद्धीकरण योजनेची सर्व कामे १ मे, २०२१ च्या आत पूर्ण करा असे स्पष्ट आदेश खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.
नागोठण्यावरील प्रेमाखातर खा. सुनील तटकरे यांनी त्यावेळी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एक विशेष बाब म्हणून ६ कोटी, ३८ लाख २५ हजार रुपयांची ही योजना मंजूर करून घेतली. नंतर नागोठण्यातील उंचावरील भागालाही सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी शृंगार तळ्याजवळील दुसऱ्या साठवण टाकीच्या वाढीव अंदाजपत्रकाने ही योजना सुमारे आठ कोटींपर्यंत पोचली. योजनेचे बहुतांश काम या आधीच पूर्ण झाले होते आता महामार्गाच्या पलीकडील वितरण व्यवस्थेचे काम देखील पूर्ण झाले असल्याने आता महामार्गापलीकडील उर्वरित पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यास हरकत नाही. ज्या वेळी हे काम पूर्ण झाले नव्हते त्यावेळी संपूर्ण गावाला एकाच वेळी पाणी मिळावे अशी भूमिका या योजनेचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन व सचिव दिलीपभाई टके यांची होती. मात्र शिवसेनेची सत्ता असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीकडून गावात २० ते २२ ठिकाणी स्टँड पोस्ट उभारून योजना ताब्यात न घेता स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्ट, २०१८ ला या योजनेचा पाणीपुरवठा प्रायोगिक तत्वावर सुरु केला. नंतर पंप हाऊसमधील पंप नादुरुस्त झाल्याने योजनेतील पाणीपुरवठा जुलै-ऑगस्ट, २०१९ च्या दरम्यान बंद झाल्यानंतर योजना ताब्यात घेतली नसल्याने दुरुस्तीचा खर्च करण्यास ग्रामपंचायतीने नकार दिल्याने योजना ठप्प झाली.
त्यामुळे खा. सुनील तटकरेंनीच आणलेल्या नागोठणेकरांच्या या जिव्हाळ्याच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेप्रकरणी आता खासदार सुनील तटकरेंनीच लक्ष टाकल्याने आता या योजनेचे काम नक्कीच पूर्णत्वास येईल व योजनेचे रीतसर उद्घाटनही खा. तटकरेंच्या हस्ते लवकरच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, योजनेचे पंप नादुरुस्त झाल्याने व विजेचे बिल न भरल्याने योजना बंद पडली होती. आता वीजबिल भरण्यात आल्याने खा. सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो असून उर्वरित पाणी वितरण व्यवस्था, पंप दुरुस्ती, पंपिंग मशीनची दुरुस्ती, अॅप्रोच ब्रिजची उंची वाढविणे, पूर पातळीला लागून असलेल्या जॅकवेलच्या ट्रान्सफॉर्मरची उंची वाढविणे ही कामे १५ दिवसांत पूर्ण करण्यात येतील. नंतर खूप काळ बंद असलेल्या जलवाहिन्या चोक होण्याची शक्यता असल्याने जलवाहीन्यांत पाणी सोडून त्यांच्या लिकेजची तपासणी करून या योजनेचे काम मार्च अखेरीस पूर्ण करण्यात येईल असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.