मला स्वत:ला ड्रायविंग येत नाही, पण रस्त्यावरच्या गाड्या बघायला खुप आवडतं, बघता बघता एक दिवस माझं लक्ष दोन कार कडे गले. रस्त्यानी त्या एकामागोमाग एक चालल्या होत्या, ते ही अगदी समान अंतर ठेवून ! म्हणजे त्या दोन कार्सच्या मध्ये एक टु व्हीलर आरामात उभी राहु शकेल, असं अंतर ठेवन… मला फार गंमत वाटली. त्या दिवसापासून दोन कार एकामागे एक दिसल्या , कि त्यांच्यातलं अंतर बघायची सवयच लागली आणि आश्चर्य म्हणजे दर वेळी दोन गाड्यांमधील अंतर तेवढंच असायचं – एक टु व्हीलर बसु शकेल एवढं!!!
अनेक दिवस निरिक्षण केल्यानंतरही मला कळेना , कि सगळ्याच गाड्यांचे ड्रायवर असं एकसारखं अंतर कसं काय ठेवतात? बराच विचार केल्या नंतर कोणाला तरी विचारायचं ठरवलं. पण विचारणार कोणाला? ज्यांना ड्रायविंग येत नाही, ते काय उत्तर देणार?
तरीही हिंमत करून जवळच्या काही मित्रांना विचारले. त्यांनी ‘माहित नाही’ असं उत्तर दिलं, काहींनी तर कोणतेही प्रश्न काय विचारतेस, म्हणून थट्टा केली… कोणी मला अभ्यासात लक्ष दे.. असं ही सांगितलं…
एक ना अनेक …सल्लेच!!!
उत्तर मात्र कोणीच दिलं नाही.
शेवटी खुप विचार करुन ज्यांना गाडी चालवता येते, अशा व्यक्तीला विचारायचं ठरवलं. एक दिवस कामानिमित्त कार मध्ये बसण्याचा योग आला आणि इतके वर्ष मनात घोळत असलेला प्रश्न सहज ओठावर आला आणि मी सहजपण विचारून टाकला …
“दोन कार मध्ये दरवेळी समान अंतर कसं असतं? कार एकामागोमाग एक सिग्नलला उभ्या असल्या किंवा रस्त्याने जात असल्या तर ते अंतर चटकन लक्षात येतं… हे अंतर किती ठेवायचं हे समजतं तरी कसं????”
ह्यावर मिळालेलं उत्तर कल्पने पेक्षाही साधे आणि सोप्पे होते…
“जो पर्यंत गाडीचे बोनट दिसत आहे, तो पर्यंत गाडी पुढे जाऊ द्यायची.. मग तेवढंच अंतर ठेवायचं. म्हणजे जर पुढच्या / समोरच्या कार ड्रायवरने अचानक रिवर्स गिअर टाकला आणि गाडी मागे घेतली, तरी गाडी धडकायला नको आणि आपले नुकसान लायला नको!”
किती साधं सोप्पं लॉजिक… पण हे उत्तर मिळताच मन वायुगतीने दुसऱ्या विचारांत गुंतले …
हेच लॉजिक आपण इतर ही ठीकाणी वापरू शकतोच कि!
जर हेच लॉजिक आपण नात्यांत वापरलं तर? मैत्रीत वापरलं तर?? सगळे भावनिक त्रास , मानसिक आजार उद्भवणारच नाहीत…!
म्हणजे नात्यांत सुद्धा असे सेफ ड्रायविंग करायचे… जोपर्यंत गाडीचं बोनट दिसतंय, म्हणजे जो पर्यंत दोन्ही बाजूंनी ओळख होतेय.. तोपर्यंत एकमेकांच्या दिशेनी चालत राहायचं… पण दोघांमध्ये किमान एवढं अंतर ठेवायचं , कि समोरचा अचानक पलटला, मागे झाला, तरी नुकसान होऊ नये… भावनिक धक्का बसून हृदय तूटू नये.
आणि त्या मानसिक त्रासातून जाण्या पेक्षा, एखादयाला मरणं सोप्पं आहे, असं वाटू नये.
एवढ्याच साठी किंवा ही एवढीच आठवण करून देण्यासाठी रस्त्यावर काही मोठ्या गाड्या किंवा ट्रक आपल्याला दिसतात ज्यावर लिहीलेले असते…
“सुरक्षित अंतर ठेवा..!!!”
- के. एस. अनु