नाभिक समाजावर बेकारीची कुऱ्हाड, शासनाने लक्ष द्यावे : संत सेना महाराज पुण्यतिथीला समाजाचे आवाहन

पोलादपूर (शैलेश पालकर) :  कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीनंतर नाभिक समाजावर सर्वाधिक बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून शासनाने नाभिक समाजाच्या समस्यांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत समाजाचे पोलादपूर तालुका अध्यक्ष विजय ग.पवार यांनी व्यक्त केले. यावेळी रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदेश बुरूणकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही समाजातर्फे करण्यात आला.

पोलादपूर तालुक्यातील नाभिक समाजाच्या नोंदणीकृत संघटनेतर्फे संत सेनामहाराज पुण्यतिथीचे आयोजन सिध्देश्वर आळीतील विजय ग.पवार यांच्या निवासस्थानी करण्यात आले असता ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कोरोनाच्या संकटकाळामध्ये सलून आणि नाभिक व्यवसायिकांना लॉकडाऊनप्रमाणेचे अनलॉकमध्येदेखील निर्बंध मोठया प्रमाणात घालण्यात आल्याने अनेक समाजबांधवांचे संसार आणि उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात आले आहे. शिक्षण नोकरीपेक्षा समाजाच्या पारंपरिक व्यवसायाने आत्मनिर्भर असलेला नाभिक समाज सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेमध्ये जीवन कंठत असल्याचे यावेळी अध्यक्ष विजय ग. पवार यांनी आवर्जून सांगितले.

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी पूजा-अर्चा तसेच अन्य उपक्रम झाल्यानंतर सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर्स तसेच अन्य निर्बंधांचे पालन करून समाजाचा प्रमुख कार्यक्रम अतिशय कमी समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.