नारी शक्ती पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, अशासकीय संस्थांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत

naree

अलिबाग : अपवादात्मक परिस्थितीमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा अनुषंगिक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती किंवा संस्था/ गट/संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत, अशा इच्छुक व पात्र व्यक्ती किंवा संस्था/गट/ संघटनांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील यांनी केले आहे.

दि.01 जुलै, 2020 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्षे आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार /स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था/गट/संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार/स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, अशी व्यक्ती किंवा संस्था/गट/ संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.

पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती इ. अपारंपारीक क्षेत्रांमध्ये महिलांना प्रोत्साहित करणे तसेच ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय व निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन जगण्याचे कौशल्य, महिलांचा आदर व प्रतिष्ठा इ. क्षेत्रांमध्ये महिलांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था/गट/संघटना यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जातो .

अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज/नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईनद्वारे केंद्र शासनाच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. या वेबसाईटची लिंक महिला व बाल विकास मंत्रालयाच्या www.wed.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावीत. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख दि.31 जानेवारी, 2021 आहे. स्व-नामनिर्देशने आणि शिफारशी दोन्हीही स्विकारले जातील. राज्य शासन, अशासकीय संस्था, विदयापीठ, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे हे देखील ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशने सादर करु शकतात.

तरी नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा अशासकीय संस्था/गट/संघटना यांना वर उल्लेख केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील यांनी केले आहे