अलिबाग : दिल्लीत दि.26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक कॅडेट्सचे स्वप्न असते. एन.सी.सी.मध्ये “रिपब्लिकन डे परेड अर्थात आर.डी परेड” ही अत्यंत मानाची समजली जाते. या आर.डी.परेडसाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल मधील सार्जंट जय महेश पाटील व कॅडेट गौरव दत्तेश डिंगणकर या दोन कॅडेट्सची निवड झाली आहे.
या कॅडेट्सने औरंगाबाद येथे झालेल्या “एक भारत श्रेष्ठ भारत” या देशपातळीवरील शिबिरामध्ये सांस्कृतिक सादरीकरणामध्ये सूवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे होणाऱ्या आर.डी.परेड पूर्वतयारी शिबिर निवड प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 116 कॅडेट्सची निवड करण्यात आली. यात ज्युनिअर डिव्हिजनच्या 35 कॅडेट्सची निवड झाली असून त्यातील दोन कॅडेट्स रायगड जिल्ह्याचे आहेत.
या कॅडेट्सना शाळेचे अधिकारी समाधान शिवाजी भंडारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 6-महाराष्ट्र बटालियनचे कमांडंट कर्नल मनीष अवस्थी व त्यांच्या सर्व परेड मार्गदर्शक स्टाफने कॅडेट्सना मोलाचे मार्गदर्शन केले.
या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. एन.सी.सी च्या विविध चाचण्यांतून विद्यार्थ्यांची आर.डी परेडसाठी निवड केली जाते. 1 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली जाते. या कालावधीत या विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. या दरम्यानचा संपूर्ण खर्च केंद्र शासनातर्फे केला जातो.
आर.डी.चे संचलन राजपथ मार्गाद्वारे रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत केले जाते. भारताच्या तिन्ही प्रकारांतील सैन्य म्हणजेच नौदल, पायदळ आणि वायुसेना, वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, पायदळ अद्ययावत शस्त्रांसह राजपथावरुन दिमाखात संचलन करतात. या संचलनाच्या सादरीकरणासाठीची पूर्वतयारी खूप काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1950 ला राजपथावर पहिल्या संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
को.ए.सो.चे जेष्ठ संचालक तसेच शाळा समितीचे सभापती पंडित शेठ पाटील यांनी या कॅडेट्सचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.के.फडतरे, शाळेचे सत्र प्रमुख शशी पाटील, सौ.पिळवणकर, सौ.खरसंबळे, इतर सर्व शिक्षकांचे कौतुक केले.