अलिबाग : लॉकडाऊन सर्वस्वी नागरिकांवर अवलंबून आहे, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन करण्याची गरज येणार नाही. मात्र नियम मोडून नागरिकांनी जर मोठ मोठया कार्यक्रमांचे आयोजन करुन किंवा सहभागी होऊन कोरोनाला निमंत्रण दिले तर मात्र नाईलाजाने लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा निर्वाळा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात रायगड जिल्ह्यातही सोशल मिडीयावरुन लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी चोधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र नागरिकांनी देखील त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.
रायगड जिल्ह्याचे अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांनी येणे आवश्यक आहे. जेणेकरुन स्थानिक अर्थकारण स्थिर राहिल. मात्र हॉटेल, रेस्टॉरंटसाठी जे निकष शासनाने लागू केले आहेत त्याचे पालन करणे गरजेचे आहे. मोठया प्रमाणावर गर्दी होत असेल तर ती कमी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांची आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षकांना देखील माहित आहेत. मोठे राजकीय सोहळे, धार्मिक सोहळे आयोजित करता कामा नये. सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्येही गर्दी होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे सर्वस्वी नागरिकांवर अवलंबून असून त्यांनी सहकार्य करावे. तसेच नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळच येणार नाही, असेही निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.