“रोज थोडं थोडं करून मरण्या पेक्षा एकदाच संपवावं स्वतः ला..!” नीता च्या मनात विचार आला.
एका एक्सीडेंट मध्ये स्वतः चा पाय गमावून बसली होती नीता. सगळीकडे धावणं, घरभर फिरणं.. सगळंच थांबलं होतं तिचं… ना घराबाहेर पडता येत.. ना घरात मनमोकळं फिरता येत… पाय गेल्या मुळे नोकरीही सुटली होती. आणि नोकरी सुटल्यामुळे ती स्वतः ला ओझं समजायला लागली होती.. तिच्या घरातल्यांवर!
तिला रोज वाटायचं.. दुसऱ्याच्या आधारावर जगण्यापेक्षा स्वतः काही तरी करावं.. पण तिचं मन त्या अपघाताच्या आठवणीतुन बाहेर पडतच नव्हतं.. आणि शरीराने ती एका खोलीत बांधल्या गेली होती..
गेले वर्षभर त्याच भिंती, तेच घर.. खिडकीतून दिसणारं ते एक दुकान.. हे पाहुन पाहुन ती कंटाळली होती.. तिला बदल हवा होता.. आणि ह्या गोष्टी वरुन तिच्यात आणि तिचा नवरा निशांतमधे सतत वाद होत होते. त्याचं म्हणणं होतं, की ‘परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही. म्हणून जे नशिबात आलंय ते मान्य करून गप्प घरात बसावं..!’
आणि हेच नेमकं नीताला पटत नव्हतं. तिला अजुनही स्वावलंबी बनायची इच्छा होती. स्वतःचं काही तरी अस्तित्व असावं अशी तिची इच्छा होती. तिला फक्त घरातलं एखादं फर्नीचर बनून आयुष्यभर पडायचं नव्हतं. तिला तिचा स्वाभिमान हवा होता. आणि तो नाहीये हे जाणवलं की तिच्या मनात मरणाचे विचार सुरु व्हायचे.. मग दिवसभर ती मरणाचाच विचार करायची.
एके दिवशी निशांत तिला समजवत म्हणाला, ” जगात अशी किती तरी माणसे आहेत, ज्यांचे हात नाहीत, पाय नाहीत.. कुणाचे डोळे नाहीत.. ते सगळेच काही स्वतः चं दुःख धरून बसतात का? रोज रोज चिडचिड करतात का? त्यांच्या साठी कोण असतं? त्याचं त्यांनाच करावं लागतं.. इथे तुझ्या दिमतीला आम्ही सगळे आहोत. तुला कशाची कमी पडू देत नाही. अजुन काय हवं तुला? स्वतः ला संपवायचा विचार सोडून जरा जगात बघ काय चाललंय..!”
त्याच्या ह्या बोलण्याने नीता विचारात पडली आणि तिला तिची वाट मिळाली..
तिने निर्णय घेतला..
जे लोक कोणत्याही प्रकारच्या त्रासात आहेत.. ज्यांच्या मनात आत्महत्या करायचे विचार येतात त्या सगळ्यांसाठी काही तरी करायचं. सगळ्यांना जगण्याची हिंमत मिळेल, बळ मिळेल असं काम करायचं.!”
नीताने तिचा निर्णय घेतला होता.. आणि निर्णय घेताच तिला तिचा हरवलेला स्वाभिमान परत मिळाल्याचा आनंद जाणवू लागला.
कधी कधी आपणही आयुष्याच्या अशाच एखाद्या टप्प्यावर असतो.. जिथे सगळं सोडून मरणं सोप्प वाटू लागतं.. जेव्हा आपणस्वतः ची मदत करू शकत नसतो ना, तेव्हा इतरांची मदत करावी.. म्हणजे आपली मदत आपोआप होते!
आणि आत्महत्या, सुसाइड वगैरे उपाय कधीच नसतात कोणत्याच प्रॉब्लेम वरचे.. कारण मरण्या साठी जेवढी हिंमत लागते ना, त्याच्या एक टक्का हिंमत जरी आपण दाखवली तर आयुष्य खुप सोप्पं आणि सुंदर बनतं..
त्यामुळे हिंमत नेमकी कधी आणि कशासाठी दाखवायची याचा योग्य निर्णय आपणच करायला हवा.
– के. एस. अनु