निवडणूक प्रचार संपल्यानंतर शिंदे गट अन् महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

police-neral
कर्जत (गणेश पवार) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीत एकमेकांची डोकी फोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. दहिवली तर्फे वरेडी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर रात्री 11 वाजता शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याने घटनास्थळी पोलीस हजर झाली होती.
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी उद्या 18 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी नेरळ येथील दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत होत असलेली चुरस पाहता रिंगणात शिंदे शिवसेना गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकट वर्तीय असलेले तसेच पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले अमर मिसाळ यांची पत्नी मेघा मिसाळ ही निवडणूक लढवत असून एकीकडे विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तर येथील माजी सरपंच चिंदू तरे यांची नातलग म्हणून नेत्रा तरे ही उच्च शिक्षित महिला ही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाल्याने तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतिकडे लागून राहिले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराचा काल शुक्रवार 16 डिसेंबर रोजी शेवटचा प्रचार दिवस संपल्याने राजकीय पुढाऱ्यांनी आता मतदारांना गुपचूप रात्री गाठण्याचा प्रयत्न सुरू केल्याने. या दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने सुरुवातीला किरकोळ वादावरून नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.
यामध्ये परस्पर कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत, तर मारहाण करताना फावडा-टिकावच्या दांडक्यांचा तर लोखंडी रॉडचा वापर केला असल्याचे जखमी कार्यकर्ते सांगत आहेत. महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार असलेले नेत्रा तरे यांचे पती निलेश तरे यांच्या डोक्यात विरोधी पक्षाचे थेट सरपंच पदाचे उमेदवाराचे पती माजी सभापती अमर मिसाळ यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला त्यात माझ्या डोक्यावर जबर मार लागला असून मी मूर्च्छित पडलो असल्याचा आरोप केला तर सोबत चार ते पाच जणांना मिसाळ यांच्या सोबत आलेल्या तरुणांनी मारहाण केली असल्याचे देखील सांगितले.
 एकीकडे आता शिंदे गटातील कार्यकर्त्यांना येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप जखमी अमर मिसाळ यांचे भाऊ विकी मिसाळ यांनी यावेळी केला तर महिलांना शिवीगाळ देखील केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
एकूणच दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे नेरळ पोलीस ठाण्यात एकमेकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याने गावात देखील तणावाचे वातावरण पासरले असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गावाला आता छावणीचे रूप आलेले दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *