सहजच.. थोडं मनातलं (लेख) : “निवड”

“छी ssss मम्मा… हे गहु किती घाण आहेत…!”
बारा वर्षांची नेहा आईला म्हणाली.
आणि गहु निवडत बसलेली तिची आई फक्त हसली…!

“सांग ना मम्मा.. आपण हे गहु का आणले? नेहमी आणतो ते का नाही आणले? ह्यावेळी तांदूळ पण टेस्टी नाही.. असं का मम्मा???”
“अगं नेहा, तुला तर माहित आहे, कोरोना मुळे लॉक डाऊन सुरु आहे. तुझ्या पप्पाचं काम बंद आहे. मग आपण नेहमी खातो ते गहु तांदूळ आणायला तेवढे पैसे कुठून येणार? म्हणून ह्यावेळी आपण कमी किमतीचे गहु घेतले. समजलं?”
“तरी पण मम्मा.. आता हे निवडावेच लागतायत ना!”
“त्यामागे सुद्धा एक कारण आहे.. माहीतीये?”
“ते कोणतं?”
“हे जे आपण गहु निवडतोय ना, ते आपल्याला गहु दिसतात.. पण देवबाप्पा काय शिकवतोय माहितीये?”
“काय?”
“तो शिकवतोय, की जसं आपण गव्हातले खडे, खराब गहु बाजूला काढतोय ना, तसंच आपल्या लाईफचं करायचं…! जे काही अनवाँटेड असेल ना, जे आपल्याला आवडत नाही, नकोसं वाटतं.. जसं आपली काही दुःख.. काही वाईट आठवणी… ते सग्गळं डोक्यातुन आणि मनातून काढून फेकून द्यायचं! म्हणजे फक्त चांगली निवड उरेल.. आणि आपल्या आयुष्यात फक्त चांगलंच राहील! जसा हा लॉक डाऊन कधी ना कधी संपणारच आहे.. मग ह्यातल्या वाईट आठवणी सोबत कशाला बाळगायच्या!”

नेहाच्या आईने सोप्प्या पद्धतीने नेहाला जे समजवलं.. ते आपणही अमलात आणायला हवं.. रोज रात्री झोपताना दिवसभरात काय चांगलं घडलं, हे निवडून स्वतः ला एकदा सांगायचं.. हवं तर कागदावर लिहायचं, मग फक्त चांगलंच आपल्याकडे येत राहील..! आणि जे नकोय ते फेकून दिलं, तर नको असलेली आठवणींची यादी साचणार नाही.. आणि त्या चांगल्या गोष्टीच डोक्यात राहतील..
ह्याने आयुष्य खुप सुंदर होईल.. आपण हे रोज करायलाच हवं..

– के. एस. अनु