पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील कापडे खुर्द येथील एक वृध्द नेत्रतपासणी शिबिरासाठी पोलादपूर शहरामध्ये आला असताना घरी वेळेवर न पोहोचल्याने शोधाशोध केली असता दरीमध्ये जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये प्राथमिक उपचारानंतर मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना मयत झाल्याची माहिती पोलादपूर पोलीसांना कळविण्यात आल्यानुसार याप्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 23-2022 नुसार नोंद केल्याची माहिती तपासिक अंमलदार संदीप शिरगांवकर यांनी दिली आहे.
दि.19 डिसेंबर 2022 रोजी पोलादपूर शहरात नेत्रतपासणी शिबिरासाठी आलेला रामचंद्र महादेव बावळेकर (वय 65, मु.पो.कापडे खुर्द,ता.पोलादपूर) हे डोळे तपासणीनंतर घरी परत गेला तरीही घरामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत न आल्याने त्याची आई आणि चुलते गंगाराम बावळेकर यांनी त्यांचा शोध घेतला असताना पोलादपूरच्या दिशेने वाटेवर त्यांची एक चप्पल आणि टॉवेल आढळून आला म्हणून त्यांचा शोध घेतल्यानंतर दरीमध्ये टेकडीच्या पायथ्याशी जखमी आणि बेशुध्द अवस्थेत मिळून आले. त्यांच्या डोक्याला आणि पोटाला मार लागलेला असल्याने त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथून त्यांना जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास जाण्यास सांगितल्याने 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता आंतररूग्ण कक्षामध्ये वॉर्ड क्रमांक 04 मध्ये दाखल करून घेण्यात आले.
मात्र, याठिकाणी उपचारादरम्यान सायंकाळी 5 वाजून 10 मिनीटांनी रामचंद्र महादेव बावळेकर यांचे निधन झाल्याचे समजून आले. यानंतर पोस्टमॉर्टेम करून जे.जे. मार्ग रूग्णालय, परीमंडळ पोलीस निरिक्षक स्वप्नाली भोसले यांनी इन्क्वेस्ट पंचनामा करून 24 डिसेंबर 2022 रोजी संबंधित कागदपत्रे पोलादपूर पोलीस ठाण्याकडे 00 नंबरने पाठविली.
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोलीस हवालदार संदीप शिरगांवकर अधिक तपास करीत आहेत.