कर्जत : कर्जत तालुक्याला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असून देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील हे आमच्यासाठी सदैव स्फूर्तिस्थान आहेत. त्यामुळे या सर्व हुतात्म्यांची माहिती आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे क्रांतिकारक आणि हुतात्मे यांच्या स्मृती जपणाऱ्या हुतात्मा चौक परिसर आदर्श बनविण्याचे काम करण्यासाठी सरकारी निधीसाठी कोणतीही कमतरता भासणार नाही असा विश्वास कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सिद्धगड बलिदान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते,त्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि आदिवासी आणि ग्रामीण भागात समाजसेवेचे कार्य करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री ट्रस्ट यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आमदार बोलत होते.
हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे बलिदानानिमित्त नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते.यावेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळास आमदार महेंद्र थोरवे तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यास जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.त्या ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक नामफलकाला नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी आणि उपसरपंच मंगेश म्हसकर यांचे हस्ते पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे तसेच मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर क्रांतिज्योत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,श्री साई ट्रस्टच्या संचालिका राधिका घुले,कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामचंद्र ब्रह्मांडे यांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांसह व्यासपीठावर नेरळ ग्रामपंचायतच्या सदस्य जयश्री मानकामे,श्रद्धा कराळे,गीतांजली देशमुख, संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी केले.
स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या हुतात्मा गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला.पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील जेष्ठ कवी,निवेदक अरुण म्हात्रे आणि कर्जत तालुक्यातील आदिवासी तसेच ग्रामीण भागात समाजसेवेचे कार्य करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांचा सन्मान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला.समानचिन्ह, मानपत्र, झाडाचे रोपे.,शाल आणि श्रीफळ असे स्वरूप असलेल्या हुतात्मा गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन आसावरी काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय शिंदे यांनी केले.याप्रसंगी नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिद्धगडाचा रणसंग्राम हे लघुनाट्य व्यासपीठावर सादर केले. तर माणगाववाडी आश्रमशाळा,नेरळ विद्या मंदिर, विद्या विकास मंदिर आणि कोतवालवाडी ट्रस्ट यांच्या विद्यार्थ्यांनी समरगीते सादर केली.तर हिंगोली जिल्ह्यातून नेरळ येथे आणलेले शाहीर प्रकाश दांडेकर यांनी पोवाडा सादर करून बलिदान दिन सोहळ्याची रंगात वाढवली.
आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढे बोलताना युवापिढीला आपल्या तालुक्यातील क्रंन्तिकारक यांनी केलेल्या कार्याची माहिती व्हावी म्हणून पत्रकारांनी स्मारक समिती स्थापन केली आणि प्रबोधनाचे काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे या दोन्ही हुतात्म्यांचे कार्य समाजापुढे पोहचण्यास मदत झाली आहे असे सांगून आमदार थोरवे यांनी नेरळ च्या हुतात्मा चौकात १५ वर्षाहून अधिक काळ दरवर्षी कार्यक्रम घेऊन क्रांतीकरणाचा इतिहास पोहचवण्याचे केंद्र ठरत असलेल्या आणि सर्वांना आकर्षित करणारा हुतात्मा चौक परिसर भविष्यात आणखी प्रेरणादायी ठरेल असे बदल करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तेवढा निधी दिला जाईल आणि या ठिकाणी भव्य स्वरूपात हुतात्मा चौकाचा विस्तार केला जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी यावेळी दिले.विठ्ठलराव कोतवाल यांनी स्वतः उच्च शिक्षित असताना स्वतःच्या कुटुंबची राखरांगोळी करीत देशासाठी बलिदान दिले.त्यावेळी हिराजी पाटील सारखा तरुण देशप्रेमाने झपाटला होता आणि त्यांनी मागेपुढे न पाहता लढ्यात उडी घेऊन बलिदान दिले या साठी घटनांनी अंगावर रोमांच उभा राहतो आणि त्यामुळे हुतात्म्यांच्या स्मृती आणखी जागृत करण्यासाठी आपण सर्व मिळवून नियोज़नबद्ध काम करूया असे आवाहन देखील आमदार थोरवे यांनी केले.
महाराष्ट्र गीताला राज्य गाण्याचा दर्जा द्यावा – अरुण म्हात्रे
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अरुण म्हात्रे यांनी शालेय जीवनात अलिबाग मध्ये शिक्षण घेताना नारायण सुर्वे,सुरेश भट,पाडगावकर यांनी वाचले. तेच नारायण सुर्वे हे नेरळ मध्ये राहिले आणि हा बहुमान नेरळकरांसाठी महत्वाचा असून ते नेरळचे भाग्य आसल्याचे प्रतिपादन म्हात्रे यांनी केले.स्वतंय काळात जाताना त्यांनी आपले आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते दिल्लीला सायमन कमिशन आले होते. तेव्हा लाला लजपतराय यांच्या बरोबर होते,त्यामुळे आपण दामूअण्णा पाटलांचा नातू असल्याचे मला अभिमान आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अनेक कवितांना स्पर्श केला. महाराष्ट्र राज्यातील अनेक कवींच्या कविता आणि त्यामागील किस्से सांगत आपल्या अर्धा तासाच्या भाषणात सर्वांना पोटधरून हसायला लावले. शेवटी अरुण म्हात्रे यांनी जाहले आम्हास भाग्य हे मराठी गीत स्वतः गाऊन आणि समोरच्या संर्वांना गायला लावून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र गीताला राज्य गीताचा दर्जा देण्याची मागणी केली.
नेरळकरांचे भरभरून प्रतिसाद…
या प्रसंगी स्वतंत्रसैनिक यांचे कुटुंबीय शरद भगत,माजी सभापती नेरळ रेल्वे संघटना अध्यक्ष संदीप म्हसकर,माजी उपसरपंच अंकुश शेळके,रेल्वे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष किसन खडे,विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव विवेक पोतदार,हाजी लियाकत शाळेचे विश्वस्त अब्दुल सहेद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष तहसीन सहेद, नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,नेरळ पेट्रोल पंपाचे प्रमुख बाळकृष्ण पादीर,शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस मनोहर हजारे,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अरविंद कटारिया,शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भाऊ क्षीरसागर कर्जत मेडिकल स्टोर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष पप्पू गांधी,विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम,विनया काकडे,माणगाववाडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार इकारे,कोतवालवाडी ट्रस्टचे व्यवस्थापक झुगरे,भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर,ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे, माजी सदस्य सुनील पारधी,वनपाल एस एच म्हात्रे,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांडे,श्रीकांत काळे,प्रगत शेतकरी हेमंत कोंडिलकर,नेरळ व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष मनोहर आयरे,अशोक गायकवाड,नेरळ टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी आदींसह विद्यार्त्थी आणि नेरळ मधील नागरिक उपस्थित होते.
स्मारक समितीचे कार्यकर्ते विजय मांडे, संतोष पेरणे, गणेश पवार, सुमित क्षीरसागर, कांता हाबळे, संजय अभंगे, गणेश पुरवत, मल्हार पवार, बंटी शिर्के यांना कार्यक्रम नियोजनात रायगड भूषण किशोर गायकवाड,आदर्श राज्य शिक्षक रवी काजळे,बंडू देशमुख,मुकुल दळवी माथेरान प्रेस क्लब चे अध्यक्ष दिनेश सुतार यांचे सहकार्य लाभले.