नागोठणे (महेश पवार) : वीज बिला संदर्भात सरकार दिलेला शब्द पाळत नसले तरी आम्ही गप्प बसणार नाहीत. वीज बिलाचे पैसे भरले नाहीत तर वीज मिटर कट करू अशी धमकी वीज वितरण कंपनीकडून जनतेला दिली जात आहे.
सर्वसामान्य जनतेकडे वीज बिल भरायला पैसेच नाहीत तर ते कुठून भरतील. गुन्हे दखल झाले तरी चालतील आमचे सैनिक वीज कट करू देणार नाहीत. असा दिलासा मनसे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांनी सर्वसामान्य जनतेला दिला आहे. मनसेचे रायगड जिल्हा प्रमुख संघटक गोवर्धन पोलसांनी यांच्या नागोठणे येथील शिवराज सदन या निवासस्थानी बाळा नांदगावकर यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मनसे माजी जिल्हाध्यक्ष मनिष खवळे उपस्थित होते.
बाळा नांदगावकर म्हणाले की मराठीच्या अंगावर कोणी आले तर आम्ही त्यांचा नळीचा घोट घेऊ, मी हिंदू आहे हिंदुत्व कदापी सोडणार नाही असे राजसाहेब ठाकरे नेहमीच सांगत असतात. राज्य सरकारकडून जनतेची कामे होत नाहीत म्हणून जनता कृष्णकुंज वर राजसाहेबांना भेटायला येतात. राज्य सरकारच्या चांगल्या निर्णयाचे आम्ही कौतुक करू परंतु वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले तर चांगले निर्णय होऊच शकत नाहीत.
तसेच कंपन्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी तसेच इतर कामे दिलीच पाहिजे असे नांदगावकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे भाजपा युती होणार का? यावर बोलताना नांदगावकर म्हणाले की, असे घडत असेल तर चांगलेच आहे. समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर आनंदच आहे असे शेवटी बाळा नांदगावकर यांनी सांगितले.