पनवेलमध्ये गाड्यांची जाळपोळ करणार्‍या माथेफिरूला पोलिसांनी केली अटक

custady
पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरात सात वाहनांची जाळपोळ करणाऱ्या माथेफिरूला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेंद्र गोळे असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, दुचाकी, आणि रिक्षा जळाली आहे.
पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली दोन मोटारसायकल आणि पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून ठेवलेल्या तीन मोटारसायकली व जवळच जोशी आळी परिसरात उभी करून ठेवलेली एक रिक्षा त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील पार्किंग मध्ये उभा करून ठेवलेला एक ट्रॅक्टर अश्या चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली सात वाहने अज्ञात इसमाने शनिवारी सात जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली.
या घटने मुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके ठीक-ठिकाणी रवाना करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला असता त्याला पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्र गोळे असे त्याचे नाव आहे. त्यांने गाड्या का जाळल्या व त्याच्याकडे ज्वलनशील पदार्थ कुठून आला याची चौकशी पनवेल शहर पोलीस करत आहेत. प्राथमिक चॊकशीत सदर आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस सूत्रांकुडून देण्यात आली आहे .
नोव्हेंबर महिन्यात कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे गाड्यांना आग लावण्यात आली होती. यात तब्बल 42 हून अधिक गाड्या जळाल्या होत्या. अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले होते. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही यातील आरोपी सापडून आलेला नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *