पनवेल (संजय कदम) : पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर स्कूल व्हॅन चालकांनी मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. स्कूल व्हॅन परवाना त्याचबरोबर शाळांचे संमती पत्र मिळत नसल्याने हा लढा उभारण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही शाळांना तर सुट्टी द्यावी लागली. या संदर्भात परिवहन विभागाने समन्वय बैठक बोलून यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी दिली. तर या आंदोलनाला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा पत्र दिले आहे.
विद्यार्थी वाहक संघटनेच्या उपोषणास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पनवेल शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा पत्र संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बढे, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव, शहर संघटिका सौ. अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, उपशहर प्रमुख रोहित (सनी) टेमघरे, शाखाप्रमुख शुभम माळी,उपशाखाप्रमुख राकेश भगत, कुणाल कुरघोडे, संजय झुगे आदींनी दिले.
पनवेल परिसरामधील विशेष करून सिडको वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी शिक्षण संस्था आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. मोठ्या संख्येने विद्यार्थी स्कूल व्हॅन मधून शाळेत येजा करतात. या विद्यार्थी वाहक वाहनांना परिवहन विभागाकडून परवान्यासाठी शाळांची संमती पत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र शाळा व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पनवेल आरटीओ कडून परवाने आडून धरण्यात आले आहेत. या कारणाने जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करावी लागत आहे.
परवाने नसल्याने इन्शुरन्स सुद्धा काढता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी वाहक खूप मोठ्या पेचामध्ये सापडले आहेत. 6 डिसेंबर रोजी आमरण उपोषणा बरोबरच वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने देण्यात आला होता.
मात्र सोमवारी यासंदर्भात शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी शिष्टाई करून एका बैठकीचे आयोजन केले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. त्यांनी परिवहन विभागातील वरिष्ठ त्याचबरोबर शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने विशेष बैठक बोलवण्याबाबत भूमिका विशद केली. त्यानुसार येत्या 8 डिसेंबर रोजी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय, रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलवली आहे.
त्यामुळे पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर संलग्न विद्यार्थी वाहकांनी आपले आमरण उपोषण पुढे ढकलले. मात्र मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून शासकीय यंत्रणा आणि शाळा व्यवस्थापनाला इशारा देण्यात आला. मंगळवारी पुन्हा एकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयात विद्यार्थी वाहकांना निमंत्रित करून लेखी पत्र त्यांना देण्यात आले.
————————-
700 स्कूल व्हॅन चालक एकवटले !
पनवेल परिसरातील एकूण 700 स्कूल व्हॅन चालक या लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झाले. कर्नाळा स्पोर्टस अकादमीच्या पाठीमागील मैदानात सर्व विद्यार्थी वाहक एकवटले. त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर परवाना नूतनीकरणाबाबत होत असलेली ससेहोलपड आणि शाळांकडून घेण्यात येणाऱ्या आडमुठ्या भूमिकेचा त्यांनी निषेध नोंदवला.
————————-
तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करणार!
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर विद्यार्थी वाहकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.