पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील धामणी गावाकडे जाणार्या रोडवर गाढी नदीच्या पुलाखाली नदीच्या पात्रात एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला असून सदर महिलेची हत्या करण्यात आली आहे. याबाबत पनवेल तालुका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सदर महिलेचे अंदाजे वय 25 वर्षे, उंची 150 से.मी., बांधा मध्यम, चेहरा काळवंडलेला, केस काळे-भोर असून, अंगात हिरव्या रंगाच पंजाबी ड्रेस, त्यामध्ये हिरव्या रंगाचा फुल बाह्याचा कुडता, त्यावर गुलाबी रंगाची फुलाची व सोनेरी रंगाच्या टिकल्यांची डिझाईन तसेच हिरव्या रंगाची सलवार कमरेस इलॅस्टीक असलेली व हिरव्या रंगाची ओढणी त्यावर सोनेरी रंगाचे टिकल्यांची डिझाईन आहे. दोन्ही हातावर कोपरापर्यंत मेहंदी काढलेली, डाव्या हाताच्या व दोन्ही पायांच्या बोटास नेल पॉलिस लावलेले, डाव्या हाताच्या पंजाच्या वरील भागावर आय लव्ह यु मॉम आणि डॅड असे गोंदलेले, तिच्या पायात काळ्या रंगाच्या चप्पल असून त्यावर शो म्युझियम असा मार्क आहे.
या महिलेची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तिचा ओढणीने व हाताने गळा दाबून तिला ठार मारल्याचे प्राथमिक स्वरुपात दिसून येत आहे. याबाबत तसेच या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि अनिल पाटील यांनी केले आहे.