पनवेल (संजय कदम) : गेल्या काही महिन्यांपासून स्कूल व्हॅन परवाना आणि शाळा संमती पत्र बाबत निर्माण झालेला पेच जवळपास सुटला आहे. गुरुवारी को.ए.सो.व्ही.के.हायस्कूल या ठिकाणी पार पडलेल्या समन्वय बैठकीमध्ये परिवहन आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना शासन निर्णयाची जाणीव करून दिली त्यानंतर उपस्थित स्कूल प्रतिनिधींनी संमती पत्र देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे यापुढे सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करणे शक्य होणार आहे.
पनवेलच्या शहरी भागामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. या ठिकाणी लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. स्कूल बसेस बरोबरच विद्यार्थी व्हॅनव्दारे शाळेत विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने ने आण केली जाते. सात प्लस एक अशी आसन क्षमता असणाऱ्या स्कूल व्हॅनची नव्याने नोंदणी बंद करण्यात आली आहे. परंतु पंधरा वर्षे कालमर्यादा असणाऱ्या या वाहनांचे परवाने नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु त्याकरता शाळांचे संमतीपत्र आवश्यक असल्याने पनवेल परिसरातील 700 स्कूल व्हॅन विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर झाली होती.
पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने या संदर्भात परिवहन विभाग आणि शाळा व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शाळांमध्ये परिवहन समितीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. पनवेल आरटीओ च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा शाळांना संमती पत्र देण्याबाबत सूचित केले. त्याचबरोबर शिक्षण विभागाने सुद्धा स्कूल व्हॅन चालकांना परवान्यासाठी संमती पत्र देण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला आदेश निर्गमित केले होते. तरीसुद्धा त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. स्कूल व्हॅन परवाने आणि संमती पत्र या कायद्याच्या कचाट्यात विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक अडकली होती. हा प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी 6 डिसेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
मात्र याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सकारात्मक भूमिका घेतली गेल्याने उपोषण दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. मात्र या दिवशी लाक्षणिक बंद पुकारून आपल्या मागण्यांकडे पनवेल विद्यार्थी वाहकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. गुरुवारी पनवेल येथे समन्वय बैठक संपन्न झाली.
यावेळी शिक्षका आमदार बाळाराम पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, जिल्हा शिक्षण अधिकारी जोत्सना पवार- शिंदे पनवेल महापालिकेचे अधिकारी गणेश शेट्टे, पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे सल्लागार हरीश बेकावडे, अध्यक्ष पांडुरंग हुमणे,उपशिक्षणाधिकारी सचिन पवार, सचिन विधाते , गटशिक्षण अधिकारी सिताराम मोहिते , माजी नगरसेवक गणेश कडू, विष्णू जोशी, शाळेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी त्याचबरोबर विद्यार्थी वाहकांचे प्रतिनिधी उपस्थित होते
——————————
अधिकाऱ्यांचे शासन निर्णयावर बोट!
संमती पत्र न मिळाल्याने स्कूल व्हॅन परवान्याचे नूतनीकरण रखडले होते. त्यामुळे विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर असतानाही शाळांकडून संमती पत्र देण्यास टाळाटाळ केली जात होते. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने पांडुरंग हुमणे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आणि आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल आणि जिल्हा शिक्षण विभागाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीची संयुक्त बैठक बोलावली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णयावर बोट ठेवत संमती पत्र देणे शाळांना कसे बंधनकारक आहे याची माहिती दिली. जर याबाबत टाळाटाळ करण्यात आली तर कायदेशीर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला. त्यानुसार शाळांकडून संमती पत्र देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
——————————
आमदार बाळाराम पाटील यांची शिष्टाई!
शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी या मुद्द्यावर मध्यस्थी आणि शिष्टाई केल्याने आमरण उपोषण टळले.त्याचबरोबर आंदोलनाची तीव्रता सुद्धा कमी झाली. त्यांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय, शिक्षण विभाग आणि पनवेल विद्यार्थी वाहक संस्था यांच्यात समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लागण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले. परिवहन आयुक्तांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. त्यानुसार स्कूल व्हॅन परवाने आणि संमती पत्र देण्याबाबतचा प्रश्न अंशतः मार्गे लागला