पनवेल : ५वी ते ८वी पर्यंच्या शाळा शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून पनवेल तालुक्यात सुरू करण्याचे आदेश असले, तरी बहुतांश शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. तर अजूनही काही शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचणी झालेल्या नाहीत, त्याचप्रमाणे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
गेले १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात ५वी ते ८वी पर्यंतच्या एकूण ४१७ शाळा आहेत, तर विद्यार्थी संख्या ७२,४५३ इतकी आहे. त्यानुसार बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत, तर महापालिका परिसरातील काही शाळा बंदच आहेत. जि. प. शाळेसह खासगी शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. यास पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्याची मागणी काही पालकांकडून करण्यात येत आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाने संमतीपत्र देणे आवश्यक आहे. संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही .त्यामुळे पालकांनी संमतीपत्र दिले तरच शाळा सुरू होतील, अशी स्थिती आहे.
कोरोना काळात बंद असलेल्या शाळा सुरू होत आहेत. शाळांना कोरोना संरक्षणाबाबतचे नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शाळा दररोज निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी एका बाकावर एकच बसण्याची व्यवस्था करणे, सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, साबण, पाणी या आवश्यक गोष्टींची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे.