पनवेलमध्ये विद्यार्थी वाहतुकीला ब्रेक ! 700 पेक्षा जास्त स्कूल व्हॅन राहणार बंद !

school-van
पनवेल (संजय कदम) : पनवेल महानगर आणि तालुक्यातील सुमारे 700 पेक्षा जास्त स्कूल व्हॅन 6 डिसेंबर पासून बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळांचे संमती पत्र आणि परवाना नूतनीकरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
यावर तोडगा निघत नसल्याने पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर संलग्न संघटनांच्या वतीने विद्यार्थी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष पांडुरंग हुमणे व इतर विद्यार्थी वाहक आमरण उपोषण करणार आहेत.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी शैक्षणिक संस्था आहेत. त्यामध्ये विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. सीबीएससी आणि स्टेट बोर्डच्या स्कूलमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. स्कूल बसेस बरोबरच स्कूल व्हॅन ने विद्यार्थ्यांना शाळेत ने आन केले जाते. ओमिनी स्कूल व्हॅन मधून विद्यार्थी वाहतुकीला बारा-तेरा वर्षांपूर्वीच परवानगी देण्यात आले होते.
अरुंद रस्त्यांमुळे बसेस ऐवजी व्हॅनला अधिक पसंती दिली जाते. या स्कूल व्हॅन परवानांचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु त्यासाठी शाळांच्या संमती पत्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याशिवाय परवाने नूतनीकरण करण्यात येत नाहीत. शासनाचे निर्देश असतानाही खाजगी शिक्षण संस्थांकडून संमती पत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
परिवहन समितीच्या बैठकीत आरटीओ शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही शाळा स्कूल व्हॅन चालकांना दाद देत नाहीत. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी सातत्याने शाळा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परवाना नूतनीकरणाचे काम थांबले आहे. त्यामुळे 700 पेक्षा जास्त स्कूल व्हॅन विनापरवानाच विद्यार्थ्यांचे वाहतूक करीत आहेत.
सुरक्षा दृष्टिकोनातून तसेच कायद्याच्या चौकटीत अशा प्रकारे विद्यार्थ्यांची ने आण करणे पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेला उचित वाटत नसल्याने आम्ही आता आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे संस्थेचे खजिनदार किसन रौंदळ यांनी सांगितले. विद्यार्थी सुरक्षितताय संवाद परिषदेतही हा प्रश्न मार्गी न निघाल्यास सहा डिसेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने देण्यात आला होता. मात्र शाळा व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण न बदलल्याने विद्यार्थी वाहकांनी आमरण उपोषणा बरोबरच मंगळापासून विद्यार्थी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
———————–
शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल!
कळंबोली सुधागड हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत रायगड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना संमती पत्र देण्यासंदर्भात आदेश दिले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांनी त्वरित याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशा सूचना जिल्हा प्राथमिक शिक्षक अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र असे असले तरी शाळांच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही. माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही शाळांना आदेश दिल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात संमती पत्र अद्यापही स्कूल व्हॅन चालकांना देण्यात आलेले नाही.
———————–
स्कूल व्हॅन चालक संघटित!
गुरुवारी पनवेल तालुक्यातील सर्व स्कूल व्हॅन चालकांची आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेबरोबरच इतर सर्व संलग्न संस्थेचे पदाधिकारी आणि सभासद या बैठकीला उपस्थित होते. यावेळी संघटितपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पनवेल आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करण्याबरोबरच विद्यार्थी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.
———————–
आमच्या व्यवसायाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता विद्यार्थी वाहकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. स्कूल व्हॅनचे करण्यास परवाने नूतनीकरण करण्यासाठी नियमानुसार शाळांनी संमती पत्र देणे बंधनकारक आहे. शिक्षण विभागाने त्यांना आदेश देऊनही शाळांची आडमुठे धोरण आणि भूमिका बदलत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात सापडले आहे. यावर तोडगा अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे 6 डिसेंबर पासून पनवेल आरटीओ समोर आमरण उपोषण आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर याच दिवशी विद्यार्थ्यांची ने आण न करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे.
—-पांडुरंग हुमणे, संस्थापक, पनवेल विद्यार्थी वाहक संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *