पोलादपुर (शैलेश पालकर) : तालुक्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या पळचिल गावामध्ये चक्क रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये गेली 19 वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. यालगतच या प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन सुसज्ज इमारत बांधण्यासाठी 2009 रोजी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते भूमिपुजन होऊन उभारलेल्या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरीत न झाल्याने नवीन इमारतीचा आता वापर न होताच जिर्णोध्दार करण्यात आल्यानंतर आज शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता अधिकृतरित्या पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन होणार आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे आणि राजिप अध्यक्ष योगिता पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपुजन खा.तटकरे पालकमंत्री असताना झाले होते तर आता तब्बल 12 वर्षांनी त्यांच्या सुकन्या ना.अदिती तटकरे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्याहस्ते उदघाटन होत असल्याने सरकारी काम 12 वर्षे थांब, असा प्रत्यय पोलादपूरवासियांना आला आहे.
स्व.प्रभाकर मोरे हे 2002 दरम्यान महाड विधानसभा मतदार संघाचे विरोधी पक्षाचे आमदार असताना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतरण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील पळचिल येथे होऊन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीतील दोन खोल्यांमध्ये रूग्णसेवा सुरू झाली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत दि. 27 फेब्रुवारी 2009 रोजी पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आल्यानंतर महाड विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत तत्कालीन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी भूमिपूजन केले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या मागणीसाठी 16 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या कोकणातील पत्रकारांच्या कशेडी घाट रोको आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आवर्जून आलेले रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष प्रभाकर उर्फ पंडीतशेठ पाटील यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीच्या बांधकामाची पाहाणी करून हे काम अतिशय मंद गतीने सुरू असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागामार्फत रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरण करणे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तीन निवासस्थाने बांधणे या कामासाठी 36 लाख 40 हजार 905 रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजूरी दिल्याने प्राथमिक शाळेतील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत होण्याऐवजी नवीन काम सुरू झाले. यानंतर या कामाची पूर्तता होऊन प्रथमच पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आता वापरण्यायोग्य झाली असून या नवीन इमारतीमध्ये तब्बल 21 वर्षांनंतर आरोग्यसेवा सुरू होत आहे.
या उदघाटन सोहळयाला रायगडचे खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील आणि विधानसभेचे स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, बांधकाम व अर्थ सभापती ऍड.निलीमा पाटील, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे व सुमन कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, आरोग्य उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे डॉ.गौरी राठोड, आरोग्य सेवा पुणे संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य सेवा मुंबई डॉ. साधना तायडे यांच्यासह पोलादपूर पंचायत समिती सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, सदस्य दिपिका दरेकर व यशवंत कासार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे आणि गटविकास अधिकारी धनंजय जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची
पालकमंत्री तटकरे यांच्याहस्ते भुमिपूजनं
पोलादपूर तालुक्यातील आड ते किनेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भुमिपूजन रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्याहस्ते आज शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. यानंतर दुपारी 1वाजता महाळुंगे रस्ता तर दुपारी 1 वाजून 30 मिनीटांनी पळचिल रस्त्याचा भुमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानंतर पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.