कोलाड (श्याम लोखंडे ) : पशु प्राण्यांवर जीवापार प्रेम करणारे त्यांच्या आजाराच्या समस्या जाणून त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांचे जीवन सुखी ठेवणारे देवदूत डॉ विठोबा मरवडे यांच्या आकस्मित निधनाने मुक्या प्राण्यांची सावली हरपली असून पशु वैद्यकीय सेवेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर कोलाड, खांब, देवकान्हे, विभागासह संपूर्ण रोहा तालुक्यात त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
डॉ विठोबा मरवडे हे रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावचे सुपुत्र व प्रतिष्ठित नागरिक रोहा पं.स.चे सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष पशूधन विकास अधिकारी त्याच बरोबर मुक्या पाळीव प्राण्यांवर जीवापार प्रेम करून त्यांच्या जीवाला जीव लावून त्यांच्यामध्ये देव शोधणारे डॉ. विठोबा धों.मरवडे यांचे अल्पशा आजाराने ठाणे येथील एका इस्पितळात उपचारादरम्यान दु:खद निधन झाल्याने त्यांच्या दु:खद निधनामुळे समस्त मरवडे परिवारासह तळवली गावावर दु:खाचे डोंगर पसरले असून संपूर्ण रोहे तालुक्यात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समस्त मरवडे परिवार व ग्रामस्थांना शोक अनावर झाला .तर त्यांचे एकाकी दु:खद निधन ही विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नव्हती.डॉ. विठोबा मरवडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीपुर्वी रोहे पं.समिती येथे पशूधन विकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कधीही आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही तर आपल्या सेवाकाळात त्यांनी पशु प्राण्यांना त्यांच्या दुखापतीवर सेवा देत चांगले काम व सेवेबरोबरच चांगले संबंध सर्वांशी जोपासले होते.
मरवडे यांचा स्वभाव अतिशय शांत, विनम्र, मनमिळाऊ व प्रेमळ परोपकारी स्वभावाचे डॉक्टर म्हणून सर्वांना विशेष परिचित होते.पशूधन खात्यात तालुका व रायगड जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरही त्यांनी सेवा करीत असताना केवल माणूसकी जपण्याचेच काम केले.वयोमानापरत्वे सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले मुक्या पाळीव प्राण्यांची सेवा करण्याचे व्रत पुढेही चालूच ठेवले होते.कोरोना लाँकडाऊन कालावधीत देखील त्यांनी विशेष परिश्रम घेत या पाळीव प्राण्यांसाठी सेवा चालू ठेवली होती. तर त्यांच्या कौशल्याचा उपयोग गोरगरीब शेतकरी वर्गासाठी करत असल्याने त्यांना समाधान मिळत असल्याचे ते आवर्जून सांगत असत.
सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारे व्यक्तिमत्व डॉ मरवडे,
पशूधन खात्यामध्ये सेवा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला गाव व समाजासाठीही भरीव योगदान दिले. गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतल्याने त्यांना परिस्थितीची पूर्ण जाणिव असल्याने आर्थिकदृष्टया गोर गरिबांना ते नेहमीच सहकार्य करीत.तसेच होतकरू युवा पिढीला नेहमी चांगले मार्गदर्शन करीत असत खांब देवकान्हे विभागात पशु वैद्यकीय सेवेबरोबरच शैक्षणिक सामाजिक आरोग्य व वारकरी संप्रदाय मंडळींना मोलाचा सहकार्य असत समाजात वावरत असताना त्यांनी कधीही आपण कोणीतरी मोठे आहोत या अविर्भावात कधीच वावरले नाहीत. कुटूंबाची जबाबदारी पार पाडत मुलांना चांगले दर्जाचे आवडीनुसार शिक्षण आज ते देखील वैद्यकीय क्षेत्रात दंत चिकित्सालयाचे शिक्षण घेऊन कार्यरत आहेत त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी देखील तेवढीच पार पाडत होते
मुक्या जनावरांची सावली तर जेष्ठ नागरिकांचा आधार हरपला,
सन 2017 ला रोहा पं समिती येथून पशुधन विकास अधिकारी पदावरून सेवा निवृत्त झाले मात्र त्यांनी आपण निवृत्त झालो म्हणून मुक्या प्राण्यांची सेवा बंद न करता अधिक ग्रामीण भागातील शेतकरी वर्गावर भर देत शेती बरोबरच शेतकऱ्यांनी गाई म्हशी शेळ्या यांचे पालन तसेच कुकुट पालन करा त्यांची जोपासना कशी केली पाहिजे आणि त्यातून व्यवसाय कसा करता येईल असा मोलाचा सल्ला ते जेष्ठ नागरिकांसमावेत युवा पीडिला देत असत .
शेतकऱ्यांचा बैल असो अथवा गाई म्हशी शेळी व पक्षी याना काही दुखापत झाली आहे हे कानावर पडताच ते ताबतोब त्याला उपचार करून बरे करत होते मात्र आज त्यांची सावलीच हरपली तर जेष्ठ नागरिकांना आपण कसे जगलो पाहिजे असा मोलाचा सल्ला देणारे व त्यांना शाब्दिक आधार देणारे व्यक्तीमत्व हरपल्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले असून समाज एका चांगल्या व नि:स्वार्थी ,समाजसेवकास मुकला असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे, भाऊ,बहिणी,पुतणे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी दि.२ सप्टेंबर तर अंतिम धार्मिकविधी दि.४ सप्टेंबर रोजी मौजे तळवली येथील निवासस्थानी होणार आहेत.