पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावरील ‘दूरदर्शन-सह्याद्री’वाहिनीवरील “टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल

पुणे : कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ व इतर नामांकित संस्थांचा व तज्ज्ञांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला.
या मालिकेचे नाव शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने “टिलीमिली” असे ठेवण्यात आले. राज्यात सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिली व मिली’ अर्थात मुले व मुली त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा रोज लाभ दिनांक २० जुलै पासून घेत आहेत. ही मालिका त्यांचे पालकही मुलांसोबत आवर्जून बघतात. मुले या मालिकेत सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी पालकांबरोबर घरी व परिसरात करून त्यातून शिकण्याचा आनंद घेतात. परंतु गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे “टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करणे करण्यात आलेले आहेत.

इयत्ता पाचवी ते आठवी

सोमवार, ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार, ३१ ऑगस्ट २०२०

वेळ  इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.३०  आठवी
सकाळी ९ ते १०.०० सातवी 
सकाळी १० ते ११.०० सहावी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०  पाचवी

  (दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)

इयत्ता पहिली ते चौथी

मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२०

वेळ  इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.३०  चौथी
सकाळी ९ ते १०.०० तिसरी
सकाळी १० ते ११.०० दुसरी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०  पहिली

वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल. सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.