पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनो, सोमवारपासून टिलीमिली होणार सुरु

dd

पुणे : इयत्ता नववी ते बारावी आणि इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा टप्प्या-टप्प्याने उघडल्या असल्या तरी अद्याप इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने पहिली ते चौथीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे (मराठी माध्यम) शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर “टिलीमिली” या दैनंदिन मालिकेद्वारे देण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे येत्या सोमवारपासून (ता. ८) या मालिकेचे प्रसारण होणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. आता इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अद्याप पहिली आणि चौथीच्या लाखो विद्यार्थी घरातूनच अभ्यासक्रमातील धडे गिरवत आहेत. राज्यातील हे शालेय विद्यार्थ्यांनी “टिलीमिली” मालिकेच्या पहिल्या सत्राचा लाभ घेतला. आता दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मालिकेद्वारे शिकता येणार आहे. ही मालिका विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी आणि शिक्षकांनीही पहावी, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. सोमवारपासून प्रसारित होणारी “टिलीमिली” मालिका बालभारतीच्या पहिली ते चौथीच्या पाठ्यपुस्तकांतील दुसऱ्या सत्राच्या पाठांवर व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे.

घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतिनिष्ठ उपक्रमातून या मालिकेत भूमिका करणाऱ्या मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जात आहेत. त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाते, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असते व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. असे केल्याने ही मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात, हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल.पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ (प्रत्येक इयत्तेचे ४८) भाग असलेली ही मालिका रविवार वगळता २४ दिवस रोज प्रसारित केली जाणार आहे. सामान्यतः: कृतिनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाशिवाय अन्य माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही मालिका उपयुक्त असणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी दिली आहे.

“टिलीमिली” मालिकेच्या दैनंदिन प्रसारणाची माहिती (रविवार वगळून) : इयत्ता पहिली ते चौथी : सोमवार ते शनिवार (८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२१ )

इयत्ता चौथी – वेळ : सकाळी ७.३० ते ८.३०

इयत्ता तिसरी – सकाळी ९ ते १०.००

इयत्ता दुसरी – सकाळी १० ते ११.००

इयत्ता पहिली – सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०

(प्रत्येकी एक तासात त्या-त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील आणि त्यात ५ मिनिटांचे मध्यंतर असेल)

 

pentimes_adv