इस्लामाबाद : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे. दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवणार्या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे.
एफएटीएफच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. यामध्ये दाऊदची संपत्ती सुद्धा जप्त करण्यात येणार आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाही असे अनेक वर्षांपासून सांगणार्या पाकने आज प्रथमच दाऊद आपल्या देशात लपून बसल्याचे सांगत त्याचा पत्तादेखील जाहीर केला आहे.
एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्याच्या भितीपोटी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना, मसूद अझह, हाफिझ सईद, दाऊद इब्राहिम यांच्यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आणि त्यांची बँक खाती सील करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत 18 ऑगस्ट रोजी दोन अधिसूचन प्रसिद्ध करत 26 नोव्हेंबक 2008 च्या दहशतवादी हल्यातील एक सूत्रधार हाफिझ सईद, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर निर्बंध घालण्याची घोषणा केली होती.
update 23-08-2020 9.00A.M.
पाकिस्तानने पुन्हा पलटी मारली
आज रविवारी प्रसिद्ध वृत्तानुसार, पाकिस्तानने शनिवारी दहशतवादी संघटनांच्या 88 प्रमुखांविरूद्ध प्रतिबंध लावण्यासंबंधी घोषणा केली होती. मुंबई साखळ बॉम्ब स्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच असल्यचे सुद्धा मान्य केले होते. शिवाय त्याच्यावर प्रतिबंध लावण्याची आणि त्याची संपत्ती जप्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता दाऊद इब्राहिम आमच्या देशात नाही, असे म्हणत पाकिस्तानने नेहमी प्रमाणे आपल्याच वक्तव्यावरून पलटी मारली आहे.