इस्लामाबाद : ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम ३७० रद्द केलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे निमित्त करून गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पण जगभरात काश्मीर प्रश्नावरून तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे.
त्यातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबाद येथे रॅली घेण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी निमंत्रित केले आहे. तसेच त्याबदल्यात श्रीनगरमध्ये इम्रान खान यांना येण्याची परवानगी देण्यात यावी, असे आव्हान दिले आहे. असे झाल्यास काश्मीरमध्ये कुठल्या नेत्याचे किती स्वागत होते, हे जगाला दिसेल, असे आव्हान त्यांनी केले आहे.
शाह मोहम्मद कुरेशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भारताच्या पंतप्रधानांना मी अखेरचा संदेश देऊ इच्छितो. कलम ३७० रद्द झाल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले. मी तुम्हाला पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री या नात्याने निमंत्रण देतो की, तुमच्या धोरणावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही मुझफ्फराबादमधील काश्मिरींसमोर रॅली घेऊन दाखवा, बघुया तुमचे स्वागत कशापद्धतीने होते. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर इम्रान खान यांना श्रीनगरला येऊ द्या. मग बघा इम्रान खान यांचे काश्मीरमध्ये कशा पद्धतीने स्वागत होते. जेव्हा काश्मीरवरून सार्वमत होईल तेव्हा होईल, पण जनतेचे सार्वमत होऊन जाईल, हिंमत असेल तर आमच्या आव्हानाचा स्वीकार करा. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना या वक्तव्यानंतर ट्विटरवर जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.