पागोटे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुजित तांडेल

pagote
उरण (विठ्ठल ममताबादे ) : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. 20 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचा निकाल लागला. प्रत्यक्ष जनतेतून सरपंच पदाची निवड झाली तर सोमवार दि 2 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी आपापला उपसरपंच निवडला. पागोटे ग्रामपंचायत मध्ये पागोटे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते सुजित हसुराम तांडेल यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
पागोटे ग्रामपंचायतची निवडणुक शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने एकत्रित लढवली. या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिवसमर्थ परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लढविली व न भूतो न भविष्यती असा चमत्कार करून दाखवत पॅनलचे (आघाडीचे ) सर्वच उमेदवार निवडून आले. जनतेने शिवसमर्थ परिवर्तन आघाडीला भरघोस मते देऊन सर्व सदस्यांना एक हाती सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. शिव समर्थ परिवर्तन आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार कुणाल अरुण पाटील हे सरपंचपदी विराजमान झाले असून उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमताने शेतकरी कामगार पक्षाचे सुजित हसुराम तांडेल यांची निवड करण्यात आली.
पागोटे ग्रामपंचायतचे ग्रामसेविका समिक्षा ठाकूर यांनी तसेच प्रशासनाचे अधिकारी अनिल जगधनी यांनी उपसरपंच पदाचे नियुक्तीपत्र सुजित तांडेल यांना दिले. सुजित हसुराम तांडेल हे शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ, कट्टर कार्यकर्ते असून ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतात. गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जातात. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतात. सर्वाशी मिळून मिसळून राहतात. सर्वांना सोबत घेउन चालतात.त्यामुळे त्यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. सुजित तांडेल यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थांनी,नातेवाईक, मित्र परिवारांनी शुभेच्छा देऊन सुजित तांडेल यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी पागोटे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *