पालघर : अवैध मद्याची वाहतूक करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरने कारवाई केली आहे. या कारवाईत 65 बॉक्स मद्य, रोख रक्कम आणि पीकअप टेम्पो, कार असा एकूण 19 लाख 37 हजार 960 रुपये किमतीची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दादरा नगर हवेली येथील विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुंदले गावाच्या हद्दीत एक टेम्पो आणि त्याच्या पाठोपाठ एक स्विफ्ट कार येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी पिकअप टेम्पो चालक टेम्पो तिथेच सोडून फरार झाला. चालकासह स्विफ्ट कार रोखण्यात पोलिसांना यश आले. या दोन्हीही वाहनांची झडती घेतली असता त्यात दादरा नगर हवेली येथून वाहतूक होत असलेलं अवैध मद्य आढळून आली.
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं केलेल्या कारवाईत पिकअप टेम्पो आणि स्विफ्ट कारमधून 65 बॉक्स दादरा नगर हवेली येथील बनावट मद्य तसेच स्विफ्ट कारच्या डॅशबोर्डमध्ये 4 लाख 36 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. अवैध मद्य, रोख रक्कम आणि पिकअप टेम्पो आणि कार असा एकूण 19 लाख 37 हजार 960 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.