पालघर : जिल्ह्यात हिल स्टेशन उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

uddhavthakare

पालघर  : पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असुन जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन स्थळाचा विकास करणे आवश्यक असल्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. ठाकरे बोलत होते. नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पुर्ण होऊन नागरिकांसाठी ऊपलब्ध होणार आहे. कुपोषण पुर्णपणे थांबवायचे असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असुन आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

जिल्ह्याला समूद्र किनारा लाभला आहे. तसेच जिल्ह्यात हिल स्टेशन तसेच नैसर्गिक सानिध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती व परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे.  जिल्ह्यात दळणवळण, रोजगार, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी  शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाहणी केली.

प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षराबद्दल विचारणा करून कलाप्रेमी असल्याचे दिसून आले. सर्व वैद्यकीय कक्षाची पाहणी झाल्यानंतर विविध रंगात काढलेली रांगोळीतील बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र पाहून मुख्यमंत्री आनंदित झाले. चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्यासोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचीही चौकशी केली. पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगविण्यात यावी यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रांगोळी कला ही चित्रकलेपेक्षा कठीण असून त्यात खूप मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, जव्हार दौऱ्यावरून मुख्यमंत्री यांचे कला प्रेम दिसून आले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, महिला अर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार श्रीनिवास वानगा, सुनिल भुसारा, रविंद्र फाटक, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ कोकण परिषेत्र पोलीस महानिरक्षक. संजय मोहिते  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, वसई विरार महानगर पालिका आयुक्त डी. गंगाथरण, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिल्ह्यातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.