पालघर/कासा : तिहेरी हत्याकांड प्रकरणी डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या, कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर कोकण पोलीस महानिरीक्षक ह्यांनी अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील गडचिंचले येथील वनविभागाच्या चेकनाक्या जवळ 16 एप्रिल रोजी एका इको कार मधून आलेल्या सुशीलगिरी महाराज(वय 35 वर्ष),चिकने महाराज कल्पवृक्ष गिरी(वय70 वर्ष) आणि त्यांच्या कार चा चालक निलेश तेलगडे(वय 30 वर्ष) ह्यांची जमावाने हत्या केली होती.ह्या प्रकरणी पोलिसांवर “स्लॅक सुपार्व्हिजन”चा ठपका ठेवीत तत्कालीन पोलीस अधीक्षक ह्यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत नंतर त्यांची बदली करण्यात आली होती.आज कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ केले तर सहाय्यक पोलिस उप निरीक्षक रवी साळुंखे व वाहन चालक कॉन्स्टेबल नरेश धोडी यांनी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी साळुंखे व दोन पोलीस हवालदार नरेश धोडी व संतोष मुकणे यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 35 पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती. गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून ह्या गुन्ह्याचा तपास केला जात असून गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. दरम्यान याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत आहे.