सुधागड : सुधागड पाली तालुक्यातील नाडसूर, जांभूळपाडा येथील रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकार्यांनी रेशन दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश देऊन सुद्धा तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने, रेशन दुकानदारांची टेस्ट न केल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
रेशनिंग वाटप करताना ई-पास मशीनवर लाभार्थ्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेताना कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यातच काहीजण पॉझिटिव्ह आढळल्याने रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी सर्व रेशन दुकानदारांची कोविड अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. परंतु सुधागड तालुका तहसीलदारांनी या आदेशाकडे दुर्लक्ष चालवले आहे, असे रेशन दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे तातडीने सर्व रेशन दुकानदारांच्या टेस्ट कराव्यात, अन्यथा संपावर जाऊ, अशा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पाली, सुधागडचे तहसिलदार दिलीप रायन्नवार यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, करोना टेस्टची किट उपलब्ध नसल्याने टेस्टला उशीर होत आहे. आतापर्यंत तालुक्यात 250 टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये पोलीस, तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांतील कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे. बुधवार, 19 ऑगस्टपासून रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या कोरोना अँटिजेन टेस्ट केल्या जातील.