पाली (विनोद भोईर) : सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये सर्वाधिक 5 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. तर उद्धव ठाकरे शिवसेनेने 1 खाते उघडले आहे. याबरोबर शेकाप 3, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1, भाजप 1, शेकाप राष्ट्रवादी आघाडी 1, शेकाप उद्धव ठाकरे शिवसेना 1 आणि शेकाप भाजपा युती 1 अशी खाती उघडली आहेत.
तालुक्यातील सिद्धेश्वर, आपटवणे, माणगाव बुद्रुक, चंदरगाव, खांडपोली, हातोंड, चिवे, घोटवडे, ताडगाव, खवली, तिवरे, शिळोशी, अडुळसे, आतोणे या 14 ग्रामपंचायतची निवडणूक झाली आहे. यापैकी चिवे व खांडपोली ग्रामपंचायतवर बाळासाहेबांची शिवसेनेचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
सदस्यपदासाठी एकूण 110 जागा होत्या. यापैकी 50 सदस्य बिनविरोध निवड झालेले आहेत. तर उर्वरित 60 सदस्य पदासाठी निवडणूक झाली. यासाठी 122 उमेदवार रिंगणात होते. तर 12 ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी एकूण 25 उमेदवार रिंगणात होते.
या निवडणुकीत शेकापने तब्बल 3 वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आणि आघाडी केलेली दिसली. पाली तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळ पासूनच उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या गटात एकच जल्लोष झाला.