रोहा : रोहा तालुक्यातील नामवंत आणि नावलौकिक असलेल्या पुई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात पुई ग्रामविकास आघाडी उभी ठाकली असून पुई ग्रामविकास आघाडीला पुई गाव,आदिवासीवाडी,पाटबंधारे कॉलनी विविध मंडळातील तरुण वर्ग,महिला वर्ग आभाळवृद्धांचा पुई ग्राम विकास आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेले सामाजिक कार्यकर्ते अनंत सानप यांच्या धर्मपत्नी सरपंच पदाचे उमेदवार सौ अस्मिता अनंत सानप यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने निश्चितच विजयाची सलामी व नवा इतिहास या ठिकाणी घडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
तालुक्यातील पुई ग्रामविकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ ग्राम दैवता पुढे श्रीफळ वाढवून करण्यात आला. तद्नंतर पुई पेट्रोल पंपावरून मोठया उत्साही वातावरणात प्रचंड रॅली काढण्यात आली.यावेळी पुई ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाच्या उमेदवार सौ अस्मिता सानप,सदस्य पदाचे उमेदवार सारिका खामकर,दिव्या चितळकर,नामदेव आंबेकर,अबिद सय्यद,प्रतिक्षा कदम,अजित लहाने,शकुंतला वाघमारे,यांच्यासह महिला,युवती व तरुण युवा कार्यकर्ते व मतदार बंधू उपस्थित होते.
यावेळी पुई ग्रामविकास आघाडीचे नेते अनंत सानप यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि गेली १५ ते २० वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाकडून तेच उमेदवार उभे केले जात असून इतर इच्छुक उमेदवार यांना संधी मिळत नसल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते. यामुळे सर्व नागरिकांमध्ये नाराजीचे सुरु उमटत आहे.
यामुळे आम्ही पुई ग्रामविकास आघाडीचे उमेदवार उभे केले असून या परिस्थितीचा फायदा आम्हाला मिळून आमच्या सरपंच पदाच्या उमेदवारांसहित सर्व सदस्य भरघोस मतधिक्याने निवडून येतील यात काय शंका नाही तसेच गावचा सर्वांगीण विकासासाठी सर्व मदतदार बंधूनी नवे परिवर्तन घडवून आणला पाहिजे आणि सदरच्या 18 डिसेंबर रोजी होत असलेले ग्राम पंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या उमेदवार व सर्व सदस्य पदाचे उमेदवार हे ग्रामविकास आघाडीचे निवडून द्याल असा विश्वास व्यक्त करत आवाहन केले आहे .