पेण (राजेश प्रधान ) : पेट्रोल डिझेल व गॅसची भरमसाठ दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात पेण तालुका शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेने आज पेण शहराच्या एसटी स्थानकासमोर आंदोलन करून सरकारचा निषेद करण्यात आला.
यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देण्यात आल्या. पेणच्या मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या या मोर्चामध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढीचा फटका बसलेले सामान्य नागरिकनीही सामील झाले होते. पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रचंड भाव वाढ झाल्यामुळे दुचाकी व चारचाकी गाडी वापरणे सामान्य माणसाला परवडत नसल्याने सदरच्या गाड्यांमध्ये पेट्रोल न टाकता धक्का मारून गाड्या नेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे व त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच्या सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. रोज होत असलेला दरवाढीमुळे सामान्य नागरिकांंचे जिवन मुश्कील झाले आहे. कोरोना व लाँकडाऊन मुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांवर मोदिसरकार दरवाढ करून हा अतिरिक्त बोजा टाकत असल्याने सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड व तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांनी दिली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, विधानसभा संघटक बाळा म्हात्रे, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, जयराज तांडेल, संतोष पाटील, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, ग्राहक संरक्षणचे नंदू मोकल, लकी बोहरा, प्रसाद देशमुख, विजय पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक धाया म्हात्रे, गडब शाखाप्रमुख सुशीला म्हात्रे, विभाग प्रमुख राजा म्हात्रे, गजानन मोकल, विषाल दोषी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेट्रोल डिझेल व गॅस वरील अन्याय दरवाढ ताबडतोब केंद्र सरकारने मागे घ्यावी असे निवेदन पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांना यावेळी देण्यात आले.