पेण (राजेश प्रधान) : पेण मधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे. यामध्ये 1983 ते 2008 पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी केली आहे. याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल 40 वर्षानंतर एकत्र येत पेणच्या विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी चे धडे शिकविण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मिलनाचा कार्यक्रम पेण येथे आयोजित करण्यात आला होता. जगातल्या अनेक देशांतून या करीता माजी विद्यार्थी आले होते. अमेरिका,इंग्लंड, दुबई,कॅनडा ,सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यासह अनेक देशांचा समावेश होता. या कार्यक्रमाकरिता सुमारे 700 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचाही समावेश होता. निविन कॉलेज उभारल्यास पुढील कॉलेजमध्ये एमपीएससी-युपीएससीचे अभियांत्रिकी वर्ग सुरू करण्याचा मानसही बोलून दाखविला. ज्या कॉलेजने आम्हाला ज्ञान आणि श्वास दिले त्याशहरात हजारो झाडांची लागवड आणि पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आधारित मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणार असल्याचेही सांगितले. यावेळी “संविध” विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी “आई डे केअर” मतिमंद मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या मा.डॉ.स्नेहलता देशमुख भुतपूर्व कुलगुरू मुंबई विद्यापीठ, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे लाडके शरद गणपुळे, प्रा.आर. बी. महाजन, कॉलेजच्या पहिल्या (1983) बॅचचे विद्यार्थी आणि म्हाडा मधील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले राजीव शेठ, पेणचे उदय साठे, उद्योजक राजू पिचिका, प्रकाश झावरे, मिलिंद बावधनकर, किरण पुजारी, कीर्ती पाटील, डॉ.अजित मराठे, माधव प्रभू, निशांत कोळगावकर, जितेंद्र गुप्ता, तुषार देसाई, मनोज भोळे, श्रीपाद फाटक, राहूल फणसाळकर, अजित दामले, आनंद देशपांडे, प्रशांत घाणेकर, रविंद्र सिंग, संदीप म्हात्रे, राजेश गुप्ते, एम्.बी.पाटील आदींच्या आयोजन कमिटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.