पेण (राजेश प्रधान) : राज्यात ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदूं धर्मांतरांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा या मागण्यांसाठी पेण येथील हुतात्मा कोतवाल चौक येथे हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्याधर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर आमदार रवीशेठ पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने तिचे 35 तुकडे करुन केलेली निघृण हत्या तसेच मुंबईतील टिळकनगर येथे रहाणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद शेखने केलेली हत्या अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.
यावेळी आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सखल हिंदू समाज-पेण, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा यांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.