पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून या अगोदर मळेघर ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. आजच्या निकालात शेकापक्षाने वर्चस्व मिळविले आहे, तर भाजपनेही मुसंडी मारली असली तरी अनेक ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांना धक्का बसला आहे.
तालुक्यातील कोलेटी, मुंढानी, कोप्रोली, मसद बुद्रुक, कणे, पाटणोली, दादर, सोनखार, करोटी, वाशिवली, वरसई, सावरसई, वरप, सापोली, रोडे या ग्रामपंचायती शेकापक्षाने मिळविल्या असून भाजपने कळवे, दुरशेत, जीते, खरोशी या ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवले आहेत. तर काॅग्रेसने डोलवी ग्रामपंचायत मिळवली आहे.
यासह निगडे ग्रामपंचायतीव शिंदे गटाने तर आंबिवली वर उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे.तर काराव, आमटेम, हमरापूर या तीन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि अटीतटीची गणली जाणारी डोलवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर परशुराम म्हात्रे यांनी बाजी मारून सदर ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाने खेचून आणली आहे. तर मळेघर ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाल्याने आज २५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला के.ई.एस. शाळेत सकाळी नऊ वाजल्यापासून सुरूवात झाली असता अनेक उमेदवारांसह प्रतिनिधीनी तीथे गर्दी केली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.