पेण ( राजेश प्रधान ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये मोदी व शहा यांचा समावेश असल्याने पेणमध्ये मोदी व शहा यांचा शिवसेनेत प्रवेश अश्या चर्चेला उधाण आले आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष व राज्य मंत्री विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात मनसेचे कामगार सेनेचे चिटणीस व रायगड उपजिल्हा अध्यक्ष पंकज शहा, मनसेचे अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष इम्रान बेमजी, उपतालुका अध्यक्ष विजय नाईक, मनसेचे पेणशहर चिटणीस सुनील मोदी, कामगार सेना कार्यकारी सदस्य अनिल आंद्रे, कोंडवी शाखा अध्यक्ष मनोहर खैरे, रावे शाखा अध्यक्ष गुरूनाथ पाटील, कोपर शाखा अध्यक्ष गणेश मोकल, यांच्यासह शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी पंंकज शहा यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री सुभाष देसााई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो मनसैनिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेमध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र असून त्यादृष्टीने सर्वांनी समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी कामाला लागा असा आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहराचा, तालुक्याचा व पर्यायाने राज्याचा विकास साधण्याकरिता शिवसैनिकाने काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.
पक्ष व संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निष्ठेने काम करणार असल्याची ग्वाही पंकज शहा यांनी दिली.
या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे विशाल दोशी, चंद्रकांत गायकवाड व अनिल चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.