पेण (राजेश प्रधान) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुक्रवारी पेण शहरात मोटारसायकल रँली काढण्यात आली.
शहरातील वाल्मिक निवास मैदान, कोळीवाडा येथे सायंकाळी 4:30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी शुक्रवारी पेण येथे काढण्यात आलेल्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या फेरीत अनेक धर्मप्रेमी हिंदूंनी भगवे फेटे परिधान केले होते. भगवे ध्वज हातात व वाहनांवर लावले होते. यामुळे अवघे पेण भगवेमय झाले होते.
या फेरीमध्ये वारकरी संप्रदाय, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, जगद्गुरु नरेंद्र महाराज संप्रदाय, सह्याद्री प्रतिष्ठन, पेण कोळी समाज, पेण जैन समाज, सकल हिंदु समाज, शिवज्योत मित्र मंडळ, कमांडो करिअर अकॅडमी, स्वराज्य प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सह्याद्री प्रातिष्ठानाचे समीर म्हात्रे व मंगेश दळवी याच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ह.भ.प. भोपतराव महाराज यांनी पुतळ्यावर पुष्प अर्पण केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पेण-खोपोली रोड – चावडी नाका – गांगल आळी – नंदीमाळ नाका – कुंभार आळी – अंबिका माता मंदिर – भगवानदास स्टेशनरी समोरून – कवंडाल तलाव बाजूने – पां. का. पाटील चौक – राजू पोटे मार्ग – बस स्थानक या फेरीच्या मार्गातून जाताना 25 डिसेंबर या दिवशी पेण येथे होणाऱ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले.