पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यातील नागरिकांची मोफत कर्करोग पूर्व तपासणी करण्याकरिता पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. मंगेश नेने यांच्या पुढाकाराने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे.
कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. यावर उपाय म्हणजे जनजागृती व कर्करोग पूर्व तपासणी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. मंगेश नेने यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अँड. मंगेश नेने, सी.एस.ई.बी हब, सोबती संस्था, कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली व टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन १६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ३ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा कोंबडपाडा येथे करण्यात आले आहे.
यामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यांचा समावेश असणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १२५ नोंदणी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान बाधित रुग्ण आढल्यास रुग्णास टाटा मेमोरियल येथे उपचाराची सोय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात कर्करोग पुर्व तपासणीसाठी कक्ष देखील सुरु करण्यात येणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी पेण तालुका मॅटर्निटी हॉस्पिटल एच. पी. मेडीसायन्स ८४४६१०८७०८, अमित नवाळे ९१३०८८९१३०, डॉ. नीता कदम ९५६१०९६४७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १२५ नोंदणी धारकांची तपासणी होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.