पेण : शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरणातील पाणीसाठा संपूर्णपणे संपला आहे. जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध कसे करायचे हा मोठा गहन प्रश्न सध्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सतावतो आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाळेबंदीचा इशारा देण्यात आला आहे. जर टाळेबंदी लागू केली तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी काय करावे या भीषण पाणीटंचाई समस्येमुळे महिलांची झोप उडाली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी या समस्येचा निपटारा करण्यासाठी टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे.
तहानेने व्याकूळ झालेल्या वाशी विभागातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भविष्याचे नियोजन करता आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ३० कोटीची हेटवणे शहापाडा धरणांना जोडणारी योजनेचे काम अपूर्ण आहे. काम करणारा ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेल्यावर दीड वर्षात एमजेपीच्या अधिकाऱ्यांने काय दिवे लावले येथील पाणीटंचाई समस्येची इथंभूत माहिती या यंत्रणांना असून देखील राजकीय नाकर्तेपणामुळे जनतेला पिण्याचे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
समस्या २५ वर्षांपासून कायम
पाणीटंचाईची समस्या तब्बल २५ वर्षे कायम ठाण मांडून बसली आहे. दरवर्षी मार्चमध्ये सुरू होणारी पाणीटंचाई समस्येची दाहकता यावर्षी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी सुरू झाली आहे. गेले २० दिवस जनतेला गढूळ पाणीपुरवठा होत होता तोही आता कमी दाबाने जेमतेम होतो आहे. गावातील पाच टक्के घरांना पाणीपुरवठा होतो. ९५ टक्के घरांमध्ये
ठणठणाट असतो. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांनी पहाणी केली.
पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला
जूनचा पाऊस पडेपर्यंत करायचे काय याचे प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. पाण्याने श्रीमंत असलेल्या हेटवणे धरणाचे पाणी सिडकोची तहान भागवत आहे. मात्र स्थानिक जनतेला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकावे लागते. पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू असतो मात्र याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासनाला नेहमीच अपयश येते. आता तरी टँकर सुरु करुन तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करावा ही मागणी आहे.