पेण : संघर्ष समितीचे 25 सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन!

पेण (सुनील पाटील ) :  मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे 25 सप्टेंबर रोजी सक्षम आरोग्य सुविधा, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील विविध पदांची नेमणूक त्वरित व्हावी व इतर महत्वपूर्ण मागण्याबाबत ठिय्या आंदोलन आहे.

कोरोनाच्याही आधी सक्षम आरोग्यव्यवस्था नव्हती आणि आता कोरोना महामारी मध्ये तर त्याचे भयावह रूप समोर आलेले आहे. कारण येथील पेण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ,सर्जन इत्यादी पदावर नियुक्त असलेले डॉक्टर्स गेली सहा ते सात वर्ष गैरहजर आहे. त्यामुळे रुग्णांना कोरोना व इतर आजाराकरिता पुरेशी सुविधा उपलब्ध होत नाही. रुग्णांच्या सेवेकरिता माहितीकरता कंट्रोल रूम उपलब्ध असावी त्याचे कॉन्टॅक्ट नंबर सर्वांना दिसावे लक्षात यावे वेळीच मदत व्हावी या आणि अशा अनेक मागण्यासाठी मूलभूत अधिकार संघर्ष समितीने त्याचा पाठपुरावा केला असता त्यानंतर वैद्यकीय अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय अधिकारी समवेत मूलभूत अधिकार संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांची बैठक ही झाली. परंतु ज्या त्रुटी, तुटपुंजी व्यवस्था आहे हेच फक्त लेखी कळविले गेले. परंतु देश सहा महिने करोना महामारी चा सामना करीत आहे, आणि पाच महिने लॉक डाऊन मध्ये होता तरी याकडे पूर्ण लक्ष दिले नाही.

आता मात्र ही आरोग्यव्यवस्था युद्धपातळीवर सक्षम सहज उपलब्ध व्हावी याकरिता नागरिकांच्या भावनेचा व आरोग्याचा विचार करून 25 तारखेला ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. या संबंधी जनजागरण करण्यासाठी मोहिनी गोरे, नंदा म्हात्रे, मंदाकिनी गायकवाड, संदीप पाटील यांनी पेण शहरात पत्रके वाटली.

कोरोना चे दुष्परिणाम, होणारे मृत्यू व नागरिकात असलेली भीती घबराहट याचे दुष्परिणाम लक्षात आले, तेव्हा आरोग्य सुविधांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे आंदोलनात त्या समस्या सोडवण्यासाठी ठिय्या आंदोलन गरजेचे आहे. सर्व जागरूक नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी केले आहे.